रावेर तालुक्यातील वाघोडमध्ये धक्कादायक प्रकार; पिण्याच्या पाण्यात चक्क पक्ष्यांची पिसे, ग्रामस्थ संतप्त

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील वाघोड गावातून प्रशासनाच्या निष्काळजीपणाचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. ग्रामपंचायतीकडून पुरवठा होणाऱ्या पिण्याच्या पाण्यात चक्क पक्ष्यांची पिसे आढळत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
वाघोड गावातील काही भागात ग्रामपंचायतीमार्फत एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. मात्र मागील काही दिवसांपासून नळातून येणाऱ्या पाण्यात पक्ष्यांची पिसे आढळत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. इतकंच नाही, तर या पाण्याला घाण वास येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या. मात्र, याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं. “तक्रारी केल्या, पण कोणी ऐकत नाही… पाणी पिण्यालायक राहिलेलंच नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया गावकऱ्यांनी व्यक्त केली.
या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दूषित पाण्यामुळे पोटाचे विकार, ताप, उलट्या, जुलाब तसेच इतर संसर्गजन्य आजारांचा धोका वाढू शकतो, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि महिलांच्या आरोग्यावर याचा अधिक परिणाम होऊ शकतो.
ग्रामस्थांनी तात्काळ पाणीपुरवठा यंत्रणेची तपासणी, जलकुंभ व पाईपलाईनची स्वच्छता आणि पाण्याची गुणवत्ता तपासणी करण्याची मागणी केली आहे. तसेच दोषींवर कारवाई करून सुरक्षित पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणीही जोर धरत आहे.
दरम्यान, वेळेत ठोस उपाययोजना न केल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. वाघोड गावातील ही परिस्थिती केवळ निष्काळजीपणाची नाही, तर नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारी असल्याने प्रशासनाने तातडीने जागं होणं गरजेचं आहे.



