अमरावतीत मध्यरात्री गुटखा तस्करीचा संशय; अंबादेवी परिसरात बोलेरोतून मोठा साठा जप्त, प्रकरणाला नवं वळण

अमरावती शहरात मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. २७ एप्रिलच्या रात्री साधारण १ वाजताच्या सुमारास अंबादेवी मंदिर परिसरात एक संशयास्पद बोलेरो पिकअप वाहन अडवण्यात आले. या वाहनात शेती बियाण्याच्या पोत्यांच्या आड मोठ्या प्रमाणात गुटखा लपवून वाहतूक केली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बडनेराकडून येणाऱ्या या बोलेरो पिकअपने रस्त्यात दोन मोपेडस्वार तरुणांना कट मारला. यामुळे संतप्त झालेल्या तरुणांनी त्या वाहनाचा पाठलाग केला आणि अंबादेवी मंदिर परिसरात गाडी अडवली. चालकाचे वर्तन संशयास्पद वाटल्याने त्यांनी स्थानिक नगरसेवक रेहान उर्फ बल्ला यांना फोन करून घटनास्थळी बोलावले.
घटनास्थळी पोहोचलेल्या रेहान उर्फ बल्ला यांनी वाहनाची तपासणी केली असता, वरच्या बाजूला शेती बियाण्याची पोती आणि खाली गुटख्याची पोती लपवून ठेवलेली आढळली. यानंतर तत्काळ कंट्रोल रूमला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयित वाहन ताब्यात घेतलं आणि संपूर्ण माल जप्त केला.
प्राथमिक चौकशीत चालकाने हा माल बडनेरातील अमिन आणि अमरावतीतील गुटखा व्यापारी जुनैद यांचा असल्याचा दावा केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी जप्त केलेला गुटखा पुढील तपासासाठी फूड अँड ड्रग विभागाकडे सुपूर्द केला आहे. मात्र, मंगळवार दुपारपर्यंत या प्रकरणी अधिकृत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.
दरम्यान, या प्रकरणाला वेगळं वळण तेव्हा मिळालं, जेव्हा बडनेरा पोलीस ठाण्यात मो. साजिद यांनी रेहान उर्फ बल्ला आणि त्यांच्या साथीदारांविरोधात गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली. साजिद यांनी दावा केला की, सिमरन बार परिसरात त्यांना चाकू आणि कट्टा दाखवून गाडी थांबवण्यात आली, त्यानंतर मारहाण करून त्यांचे अपहरण करण्यात आले.
या तक्रारीनंतर प्रकरण अधिकच गूढ बनलं असून, गुटखा तस्करीसोबतच अपहरण, धमकी आणि मारहाणीच्या आरोपांमुळे या प्रकरणाला गंभीर वळण मिळालं आहे. आता या संपूर्ण घटनेत नेमकं सत्य काय, हे पोलीस तपासातूनच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, पोलिसांनी सिमरन बार आणि अंबादेवी परिसरातील CCTV फुटेज तपासण्याची प्रक्रिया सुरू केली असून, जप्त करण्यात आलेल्या गुटख्याचा नेमका साठा किती, याचाही तपास सुरू आहे. अमरावतीतील हे प्रकरण केवळ गुटखा तस्करीपुरतं मर्यादित नसून, त्यामागे मोठं रॅकेट असल्याची शक्यता नाकारता येत नाही.



