नागपुरात घरफोडीचा पर्दाफाश; अंबाझरी पोलिसांनी अट्टल चोराला जेरबंद, चोरीचा मुद्देमाल जप्त

नागपूर शहरात वाढत्या घरफोडीच्या घटनांदरम्यान अंबाझरी पोलिसांनी मोठी कारवाई करत एका अट्टल गुन्हेगाराला अटक केली आहे. गांधीनगर परिसरात घडलेल्या घरफोडीचा छडा लावत पोलिसांनी आरोपीला जेरबंद केलं असून त्याच्याकडून चोरीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
ही घटना अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गांधीनगर भागातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निकिता जितेंद्र पठानिया या १९ एप्रिल २०२६ रोजी आपल्या मुलीकडे पुण्याला गेल्या होत्या. दरम्यान, २४ एप्रिल रोजी शेजाऱ्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तुटलेले पाहिले. घरात शिरून पाहणी केली असता घरफोडी झाल्याचे उघड झाले.
या घटनेची माहिती मिळताच नातेवाईक पंकज कापसे यांनी अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि संशयितांच्या हालचालींचा मागोवा घेत पोलिसांनी सागर उर्फ भांजा अशोक वर्मा याला ताब्यात घेतले.
पोलिसी चौकशीत सागर वर्माने घरफोडीची कबुली दिली. त्याच्याकडून एक सोन्याची अंगठी, चांदीचा शिक्का आणि तोडलेल्या अवस्थेतील डिजिटल लॉकर असा एकूण २६ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सागर उर्फ भांजा वर्मा हा रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. त्याच्या अटकेनंतर शहरातील इतर भागांतील घरफोडी आणि चोरीच्या घटनांचाही तपास वेगाने सुरू करण्यात आला आहे.
महत्त्वाचे म्हणजे, आरोपीकडून इतर गुन्ह्यांतील मुद्देमालही हस्तगत करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, आणखी अनेक घरफोडींचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
अंबाझरी पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे नागपूर शहरातील घरफोडीच्या घटनांना मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, या प्रकरणातून आणखी धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.



