अमरावतीत २०० रुपयांसाठी तरुणावर चाकू हल्ला; मुख्य आरोपी फरार, शहरात भीतीचे वातावरण

अमरावती शहरात किरकोळ कारणांवरून वाढणाऱ्या गुन्हेगारी घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अवघ्या २०० रुपयांसाठी झालेल्या वादातून एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महावीर नगर परिसरातील अंबा मंगलमजवळ २० एप्रिलच्या मध्यरात्री ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, शैलेश लक्ष्मणराव राणे (वय ३१, रा. शिवशक्ती नगर) हे रात्री घरी परतत असताना आरोपी अजय वानखडे आपल्या दोन साथीदारांसह तेथे आला.
यावेळी आरोपींनी शैलेश राणे यांना अडवून दारू पिण्यासाठी २०० रुपयांची मागणी केली. मात्र, राणे यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये वाद निर्माण झाला. हा वाद काही क्षणांतच विकोपाला गेला आणि आरोपी अजय वानखडे याने चाकू काढून राणे यांच्या कंबरेवर वार केला.
हल्ल्यानंतर तिन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी शैलेश राणे यांना उपचारासाठी इर्विन रुग्णालयात दाखल केले.
या प्रकरणात पोलिसांनी तत्पर कारवाई करत दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. मात्र, मुख्य आरोपी अजय वानखडे अद्याप फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विशेष पथक तयार करण्यात आले आहे.
दरम्यान, किरकोळ कारणांवरून शहरात सातत्याने होत असलेल्या जीवघेण्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मुख्य आरोपीला लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.



