परतवाडा व्हायरल व्हिडिओ प्रकरणात मोठी घडामोड; चारही आरोपींना २७ एप्रिलपर्यंत वाढीव पोलिस कोठडी

परतवाडा-अचलपूर परिसरात गाजत असलेल्या बहुचर्चित व्हायरल व्हिडिओ प्रकरणात आज मोठी घडामोड घडली आहे. चारही आरोपींचा पोलिस कोठडी रिमांड संपल्यानंतर त्यांना अचलपूर जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी वाढीव कोठडीची मागणी केली आणि न्यायालयाने ती मान्य करत आरोपींना २७ एप्रिलपर्यंत पुन्हा पोलिस कोठडी सुनावली.
आरोपींचा २१ एप्रिलपर्यंतचा PCR संपल्यानंतर त्यांना आज न्यायालयात आणण्यात आले होते. या वेळी न्यायालय परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विशेष म्हणजे, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी RCP प्लाटूनचीही नियुक्ती करण्यात आली होती.
तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींकडून व्हायरल व्हिडिओ तयार आणि प्रसारित करण्यासाठी वापरण्यात आलेले मोबाईल, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत. या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले की, या प्रकरणाचा तपास अद्याप अपूर्ण आहे आणि अनेक महत्त्वाचे मुद्दे तपासायचे बाकी आहेत. आरोपींच्या मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी, व्हायरल व्हिडिओशी संबंधित डिजिटल पुरावे, बँक व्यवहारांची चौकशी, तसेच आरोपींमध्ये आर्थिक व्यवहार झाले का, याची माहिती मिळवणे आवश्यक आहे.
याशिवाय, मुख्य आरोपीकडे असलेल्या थार गाडीची तपासणी आणि त्या गाडीत आढळलेल्या कथित शस्त्राचा तपासही अद्याप बाकी असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या सर्व तपासासाठी आरोपींची आणखी कोठडी आवश्यक आहे.
दुसरीकडे, बचाव पक्षाने पोलिसांच्या मागणीला विरोध केला. आधीच दिलेल्या कोठडीत पोलिसांना कोणतेही ठोस पुरावे मिळाले नसल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, थार गाडीत सापडलेले शस्त्र हे खरे रिव्हॉल्वर नसून एअर गन असल्याचेही बचाव पक्षाने न्यायालयात नमूद केले.
दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने पोलिसांना तपास जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर चारही आरोपींना २७ एप्रिलपर्यंत वाढीव पोलिस कोठडी मंजूर केली.
या प्रकरणाचा तपास आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून, पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. २७ एप्रिलपर्यंतच्या वाढीव कोठडीतून पोलिसांना कोणते नवे पुरावे मिळतात आणि या प्रकरणात आणखी कोणते धक्कादायक खुलासे होतात, याकडे संपूर्ण परतवाडा-अचलपूर परिसराचे लक्ष लागले आहे.



