AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

तपोवन परिसरात बिबट्याची दहशत

माधवी विहार आणि संकेत कॉलनीत १० ते १५ दिवसांपासून वावराचा दावा; नागरिक व भाकपच्या पदाधिकाऱ्यांचे वनविभागाला निवेदन

अमरावती प्रतिनिधी : तपोवन परिसरातील माधवी विहार आणि संकेत कॉलनी परिसरात मागील १० ते १५ दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचा दावा नागरिकांनी केला असून, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याने एका कुत्र्याची शिकार केल्याचे सीसीटीव्ही चित्रणात दिसून आल्याचा दावाही नागरिकांनी केला आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित बिबट्या मागील काही दिवसांपासून सायंकाळी साधारण ६ ते ७ वाजताच्या दरम्यान परिसरात दिसून येत आहे. त्यामुळे सायंकाळच्या वेळेस लहान मुलांना खेळण्यासाठी बाहेर पाठवणे, तसेच वृद्ध आणि महिलांनी घराबाहेर पडणे धोकादायक वाटू लागल्याने अनेक नागरिकांनी सायंकाळी बाहेर जाणे कमी केले आहे.

लहान मुले आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न

सायंकाळच्या वेळेस कॉलनी परिसरात लहान मुले खेळत असतात, तर अनेक नागरिक आणि वृद्ध शतपावली व फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडतात. बिबट्याचा नियमित वावर असल्याच्या दाव्यामुळे लहान मुले, वृद्ध आणि नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, परिसरातून वाहणारा नाला झाडे-झुडपे आणि अस्वच्छतेने वेढलेला असून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अंधार असतो. तसेच रस्त्यांवर पुरेशा क्षमतेचे आणि प्रभावी प्रकाश देणारे स्ट्रीट लाईट नसल्याने रात्रीच्या वेळी परिसरात अंधाराचे प्रमाण वाढते.

पिंजरा लावून उपाययोजना करण्याची मागणी

या पार्श्वभूमीवर ठोस उपाययोजना करून बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी परिसरातील महिला आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या तपोवन शाखेच्या वतीने करण्यात आली आहे.

यासंदर्भात ३० ऑक्टोबर २०२६ रोजी उपवनसंरक्षक, अमरावती परिक्षेत्र वनविभाग यांच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थित धंदर, आरएफओ यांच्यासोबत प्रतिनिधी मंडळाने चर्चा करून परिसरातील परिस्थितीची माहिती दिली. बिबट्याच्या वावराबाबत आवश्यक ती खबरदारी आणि उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदन देताना हे होते उपस्थित

प्रतिनिधी मंडळात कॉम्रेड अशोक सोनारकर, सरचिटणीस अखिल भारतीय किसान सभा, कॉम्रेड सुशील ढोले, सचिव तपोवन विद्यापीठ शाखा, तसेच कॉम्रेड लता सोनारकर, महिला फेडरेशनच्या संघटक यांच्यासह रुपाली गवई, नीता रताळे, शिल्पा खिल्लारे, सोनाली भोयर, तृप्ती नांदुरकर, अर्चना डोंगरे, माधुरी हजारे, अपर्णा सरे आणि उज्वला हंबर्डे उपस्थित होत्या.

परिसरातील नागरिकांनी वनविभागाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक ती तातडीची उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे. बिबट्याच्या वावरासंदर्भातील परिस्थितीची वनविभागाकडून पडताळणी करून पुढील कार्यवाही केली जाणार का, याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button