नागपूर ग्रामीणमध्ये घरफोडीच्या आठ गुन्ह्यांची उकल

गुन्हेशाखा युनिट क्रमांक १ ची कारवाई; दोन आरोपी अटकेत, ६ लाख ५१ हजारांचा मुद्देमाल जप्त
नागपूर प्रतिनिधी : नागपूर ग्रामीण हद्दीतील विविध ठिकाणी घडलेल्या घरफोडीच्या तब्बल आठ गुन्ह्यांची उकल करण्यात गुन्हेशाखा युनिट क्रमांक १ च्या पथकाला यश आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे ६ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हेशाखा युनिट क्रमांक १ चे अधिकारी आणि अंमलदार हे गुन्ह्यांचा शोध घेत असताना त्यांना दोन इसम संशयास्पदरीत्या फिरताना दिसून आले. पोलिसांना पाहताच ते पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी तत्काळ दोघांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. चौकशीदरम्यान त्यांची नावे नवर प्रकाश रामजीराव वय ३९ वर्षे, रा. वाडी, ता. हिंगणा, जि. नागपूर आणि हुनुमान मंजराजून, रा. विहापूर हिंगणा रोड, नागपूर अशी असल्याचे समोर आले.
कसून चौकशीत घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली
पोलिसांनी दोन्ही आरोपींची अधिक सखोल चौकशी केली असता, ते घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींनी नागपूर ग्रामीण हद्दीतील वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडीचे एकूण आठ गुन्हे केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपींकडून एक ग्रॅम सोन्याची लगड, सोन्याचे वेगवेगळे दागिने, चांदीचे एकूण १२ शिक्के व इतर चांदीचे दागिने असा ऐवज जप्त केला.
तसेच घरफोडीच्या गुन्ह्यांसाठी वापरण्यात आलेले दोन ॲक्टिव्हा मोपेड, एक हिरो पॅशन प्रो दुचाकी आणि दोन मोबाईल असा मुद्देमालही पोलिसांनी ताब्यात घेतला.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ६ लाख ५१ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी बुटीबोरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस आयुक्त नागपूर शहर मा. श्री. नवीनचंद्र रेड्डी, सहपोलीस आयुक्त मा. श्री. निसार तांबोळी, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे मा. श्री. दीपक अग्रवाल, पोलीस उपआयुक्त डिटेक्शन मा. श्री. वैभव जाधव तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
गुन्हेशाखा युनिट क्रमांक १ चे पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत उके आणि त्यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदारांनी ही यशस्वी कारवाई केली.



