शिंदेंच्या हस्ते उद्घाटनापूर्वीच ठाकरे सेनेकडून रुग्णालयाचे उद्घाटन!

आदित्य ठाकरेंच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या रुग्णालयाची कोनशीला हटवल्याचा आरोप; नांदेडमध्ये दोन्ही शिवसेनांमध्ये श्रेयवादाची लढाई
नांदेड प्रतिनिधी : नांदेडमध्ये शासकीय रुग्णालयाच्या उद्घाटनावरून राजकारण चांगलेच तापले असून, दोन्ही शिवसेनांमध्ये श्रेयवादाची लढाई रंगली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रुग्णालयाचे लोकार्पण होण्यापूर्वीच ठाकरे गटाच्या शिवसेनेने शनिवारी सकाळी रुग्णालयाचे उद्घाटन केल्याचा दावा करण्यात आला आहे.
नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील वाडी येथे शंभर खाटांच्या शासकीय रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. या रुग्णालयाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून, त्यासाठी शिंदे गटाच्या शिवसेनेकडून जोरदार तयारी करण्यात आली होती.
मात्र, लोकार्पण सोहळ्यापूर्वीच ठाकरे गटाच्या शिवसेनेने रुग्णालयाचे उद्घाटन केल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
कोनशीला हटवल्याने ठाकरे गट आक्रमक
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात या रुग्णालयासाठी निधी मंजूर करण्यात आला होता. तसेच रुग्णालयाच्या उभारणीसाठी भूमिपूजन युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते.
भूमिपूजनानंतर रुग्णालय परिसरात आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झालेल्या भूमिपूजनाची कोनशीला लावण्यात आली होती. मात्र, ही कोनशीला हटविण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून करण्यात आला आहे. यामुळे ठाकरे गटाचे पदाधिकारी आक्रमक झाले असून, रुग्णालयाच्या उभारणीचे श्रेय घेण्यावरून दोन्ही गटांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे.
शिंदे गटाला श्रेय घेण्याचा अधिकार नाही – ठाकरे गटाचा दावा
या रुग्णालयाच्या उभारणीसाठी निधी मंजूर करण्यापासून ते भूमिपूजनापर्यंतची प्रक्रिया उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झाली असल्याचा दावा ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
शिंदे गटाच्या शिवसेनेने या रुग्णालयाचे श्रेय घेऊ नये, तसेच उद्घाटनाचा राजकीय श्रेयवाद करू नये, अशी भूमिका ठाकरे गटाच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बबन बारसे आणि तालुकाप्रमुख सुनील पाटील कदम यांनी व्यक्त केली.
दरम्यान, रुग्णालयाच्या उद्घाटनावरून नांदेडमध्ये दोन्ही शिवसेनांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचे चित्र दिसत असून, या राजकीय संघर्षामुळे शासकीय रुग्णालयाचे लोकार्पण चर्चेचा विषय ठरले आहे.
बाईट : बबन बारसे – जिल्हाप्रमुख, ठाकरे गट शिवसेना, नांदेड
बाईट : सुनील पाटील कदम – तालुकाप्रमुख, ठाकरे गट शिवसेना



