AmravatiAmravatiMahanagarpalikaAmravatiMunicipalCorporationcitynewsLatest NewsMaharashtra

गणेश कॉलनीतील सर्व्हिस लाईनची दोन वर्षांपासून साफसफाई नाही

नालीत घाण व झुडपांचा विळखा; उंदीर, साप आणि डासांच्या वाढत्या त्रासाने नागरिक त्रस्त

अमरावती प्रतिनिधी : शहरातील गणेश कॉलनी परिसरातील पूर्व-पश्चिम दिशेने जाणाऱ्या सर्व्हिस लाईनची मागील तब्बल दोन वर्षांपासून योग्य प्रकारे साफसफाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. नाल्यांमध्ये साचलेली घाण, वाढलेली झुडपे तसेच उंदीर, साप आणि डासांचा वाढता वावर यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ही सर्व्हिस लाईन श्री धनागरे, प्राध्यापक बी. जी. कडू, श्री गणेश खारकर, राजेंद्र बहाड, राजू देशमुख, राऊत तसेच सागर देशमुख यांच्या घरामागील परिसरातून जात असल्याचे नागरिकांनी सांगितले.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मध्यंतरी परिसरातील काही झुडपे छाटण्यात आली होती. मात्र, सर्व्हिस लाईनमधील नाल्याची पूर्णपणे साफसफाई करण्यात आली नाही. परिणामी नालीत घाण साचून राहिली असून, परिसरात डासांचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे.

उंदीर आणि सापांच्या वर्दळीने भीतीचे वातावरण

सर्व्हिस लाईन आणि नाल्यांमध्ये झुडपे व घाण वाढल्यामुळे उंदीर आणि सापांचा वावर वाढल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, विशेषतः लहान मुले आणि वृद्धांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

वारंवार तक्रारी करूनही कारवाई नसल्याचा आरोप

परिसरातील नागरिकांनी सांगितले की, या समस्येबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि चारही नगरसेवकांना वारंवार माहिती देण्यात आली आहे. मात्र, अद्यापपर्यंत नाल्याची पूर्ण साफसफाई झालेली नसून, वाढलेली झुडपेही नियमितपणे हटविण्यात आलेली नाहीत, असा नागरिकांचा आरोप आहे.

प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी

पावसाळ्यानंतरही नाल्यांची आणि सर्व्हिस लाईनची योग्य प्रकारे स्वच्छता न झाल्याने आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संबंधित महानगरपालिका प्रशासनाने तातडीने या परिसराची पाहणी करून नालीतील गाळ व कचरा काढावा, झुडपे साफ करावीत तसेच डास आणि सापांच्या वाढत्या उपद्रवावर उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

परिसरातील नागरिकांनी आपल्या समस्येकडे प्रशासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी प्रसारमाध्यमांमार्फत ही बाब मांडली असून, आता संबंधित प्रशासन या गंभीर समस्येची दखल घेऊन प्रत्यक्षात कधी कार्यवाही करते, याकडे गणेश कॉलनीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button