पराभवातून आत्मचिंतन करून महायुतीतील समन्वय सुधारावा

एकमेकांवर आरोप टाळून चुका दुरुस्त करण्याची गरज; वन्यप्राण्यांना जंगलातच पाणी-चारा उपलब्ध करण्यासाठी उपाययोजना – राज्यमंत्री आशिष जयस्वाल
नागपूर प्रतिनिधी : प्रत्येक पराभव काहीतरी शिकवून जातो. पराभवानंतर आत्मचिंतन करून झालेल्या चुका आणि व्यवस्थापनातील त्रुटी दुरुस्त करणे आवश्यक आहे, अशी भूमिका राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केली. महायुतीतील समन्वयाचा अभाव ज्या ठिकाणी जाणवला, तो दूर करून भविष्यात एकमेकांवर आरोप करण्याची चूक टाळली पाहिजे, असेही ते म्हणाले.
काही जागांवरील पराभवाचे आत्मचिंतन आवश्यक
अपेक्षित नसतानाही काही जागांवर महायुतीला विजय मिळवता आला नाही. या पराभवातून योग्य धडा घेऊन व्यवस्थापन आणि समन्वयातील त्रुटी दूर करणे आवश्यक असल्याचे जयस्वाल यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीमध्ये जसे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होताना दिसतात, तसे चित्र महायुतीमध्ये निर्माण होऊ नये, असे सांगत त्यांनी सर्व घटक पक्षांनी संयम राखण्याचे आवाहन केले.
महायुतीची साथ केवळ एखाद्या एका पक्षाने नव्हे, तर प्रत्येक घटक पक्षाने दिली पाहिजे. अन्यथा ते महायुतीच्या धर्माच्या विरोधात ठरेल, असे जयस्वाल यांनी ठामपणे सांगितले.
वन्यप्राण्यांना जंगलाबाहेर येण्यापासून रोखण्यासाठी नियोजन
पावसाचे प्रमाण कमी झाल्याने वनक्षेत्रातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत कमी झाले असून, त्यामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात जंगलाबाहेर येण्याची शक्यता वाढली आहे. ही परिस्थिती टाळण्यासाठी वन विभागासोबत बैठक घेऊन जंगलामध्येच पाण्याचे स्रोत उपलब्ध करण्याबाबत नियोजन सुरू असल्याची माहिती जयस्वाल यांनी दिली.
वन्यप्राण्यांची संख्या वाढत असताना दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यास समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले. ज्या भागांमध्ये जंगलातील पाण्याचे स्रोत आटले आहेत, तेथे बोअरवेलच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करणे तसेच आवश्यक ठिकाणी रेनगनचा वापर करून चारा उत्पादनास मदत करणे, अशा उपाययोजनांच्या सूचना वन विभागाला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
रब्बी हंगामात कमी पाणी लागणाऱ्या पिकांना प्राधान्य
मागील वर्षाचा पाणीसाठा विविध प्रकल्पांमध्ये उपलब्ध असला तरी भविष्यातील परिस्थिती लक्षात घेऊन पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे रब्बी हंगामात कमी पाणी लागणाऱ्या पिकांना प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात येत असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने चारा उत्पादन वाढविण्यावरही भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
कुंभमेळ्यावरून रोहित पवारांवर टीका
रोहित पवार यांच्या भूमिकेवर टीका करताना आशिष जयस्वाल यांनी हिंदीत प्रतिक्रिया दिली. हिंदुत्ववादी विचारांच्या उपक्रमांसाठी अंदाजपत्रकीय तरतूद किंवा खर्चाचा प्रस्ताव मांडला की विरोधकांकडून विरोध केला जातो, अशी टीका त्यांनी केली.
कुंभमेळ्यासारख्या मोठ्या धार्मिक आयोजनामध्ये केवळ खर्च होत नाही, तर देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांमुळे स्थानिक आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा फायदा होतो, असे जयस्वाल यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारच्या नियती आणि निर्णयक्षमतेवर सातत्याने शंका उपस्थित करण्याचे काम विरोधक करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.



