सिगारेटच्या पैशांवरून रक्तरंजित हल्ला! नागपुरात सहा जणांची अटक; दोन आरोपी फरार

नागपूर शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीचा थरार समोर आला आहे. कपिलनगर परिसरातील हायवे इन बारसमोर सिगारेटच्या पैशांवरून झालेला किरकोळ वाद चक्क जीवघेण्या हल्ल्यात बदलला. सहा जणांच्या टोळीने चाकू आणि लोखंडी रॉडने हल्ला करत वाहनाची तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सहा आरोपींना अटक केली असून, आणखी दोन आरोपी अद्याप फरार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २० एप्रिल रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेका नाका परिसरात घडली. फिर्यादी शेख अकील शेख जलील हे आपल्या मित्रांसह जेवणासाठी हायवे इन बार येथे गेले होते. त्यावेळी आरोपी मोहम्मद अझहर शेख याने सिगारेटचे बिल भरण्याची मागणी केली. मात्र, फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला.
हा वाद काही क्षणांतच विकोपाला गेला. आरोपी मोहम्मद अझहर शेख आणि त्याचा साथीदार हुसैन कुरेशी उर्फ अरमान यांनी इतर साथीदारांना घटनास्थळी बोलावले. त्यानंतर आरोपींनी एकत्रितपणे फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांवर चाकू व लोखंडी रॉडने हल्ला चढवला. हल्ल्यात फिर्यादींना गंभीर इजा झाली असून, आरोपींनी त्यांच्या वाहनाचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड केली.
या घटनेनंतर कपिलनगर पोलीस ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न, मारहाण, शस्त्रांचा वापर आणि मालमत्तेचे नुकसान अशा विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी वेगाने तपास करत सहा आरोपींना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मोहम्मद अझहर शेख, हुसैन कुरेशी उर्फ अरमान, प्रिन्स उर्फ पिंटू उपाध्याय, अश्विन उर्फ चिंटू चौधरी, इरफान खान आणि फरान खान यांचा समावेश आहे. या कारवाईत नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली कपिलनगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.
दरम्यान, या गुन्ह्यातील आणखी दोन आरोपी फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे. किरकोळ कारणावरून झालेला हा जीवघेणा हल्ला नागपूर शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरत आहे. आता फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात कधी अडकतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



