एव्हरेस्टच्या कुशीत दोन हेलिकॉप्टर्सची हवेत भीषण धडक; भारतीय नागरिकाचा मृत्यू, सीसीटीव्ही व्हिडिओ समोर

नेपाळच्या फेरीचे हेलिपॅडवर लँडिंगदरम्यान अपघात; दोन्ही हेलिकॉप्टर्सचे रोटर ब्लेड्स एकमेकांवर आदळले, पायलटसह अनेक जण जखमी
नेपाळ : जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नेपाळमधील सोलुखुंबू जिल्ह्यातील फेरीचे हेलिपॅडवर लँडिंगदरम्यान दोन हेलिकॉप्टर्सची हवेत भीषण धडक झाली. या दुर्घटनेत एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. दोन्ही हेलिकॉप्टर्सच्या रोटर ब्लेड्सची एकमेकांना धडक बसल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या संपूर्ण घटनेचा थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून, त्यामध्ये अपघाताची भीषणता स्पष्टपणे दिसून येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी साधारण ८ वाजून ११ मिनिटांच्या सुमारास हा अपघात घडला. सोलुखुंबू जिल्ह्यातील फेरीचे येथील हेलिपॅडवर फिस्टेल एअर आणि डायनेस्टी एअर या दोन कंपन्यांची हेलिकॉप्टर्स लँडिंगसाठी येत असताना हा प्रकार घडला. दोन्ही हेलिकॉप्टर्सच्या रोटर ब्लेड्सची एकमेकांना धडक बसल्याने अचानक दुर्घटना घडली. या धडकेमुळे हेलिपॅड परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर या अपघाताची चर्चा सुरू झाली आहे.
नेपाळ पोलिसांच्या प्राथमिक अहवालानुसार, या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या भारतीय नागरिकाची ओळख वसंत कुमार बालाराम रामाडू अशी पटवण्यात आली आहे. ते फिस्टेल एअरच्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. त्याच हेलिकॉप्टरमध्ये भारतीय वंशाचे न्यूझीलंडचे नागरिक शैलेश कृष्ण पटेल हे देखील प्रवास करत होते. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने हेलिकॉप्टरच्या मदतीने काठमांडू येथील मेडिसिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या दुर्घटनेत दोन्ही हेलिकॉप्टर्सचे पायलट कॅप्टन प्रज्वल केसी आणि कॅप्टन रवींद्र प्रजापती हे देखील जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच बचावकार्याला वेग देण्यात आला. सिमरिक एअरचे हेलिकॉप्टर मदत आणि बचावकार्यासाठी घटनास्थळी पाठवण्यात आले. जखमींना सुरक्षित ठिकाणी हलवून पुढील उपचारांची व्यवस्था करण्यात आली.
दरम्यान, दोन्ही हेलिकॉप्टर्समध्ये नेमके किती प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते, याबाबतची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. तसेच दोन्ही हेलिकॉप्टर्स एकाच वेळी हेलिपॅडवर कशा प्रकारे पोहोचली आणि लँडिंगदरम्यान सुरक्षित अंतर का राखले गेले नाही, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.
माउंट एव्हरेस्टसारख्या उंच आणि आव्हानात्मक पर्वतीय भागात हेलिकॉप्टर वाहतूक मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. मात्र, या परिसरातील बदलते हवामान, मर्यादित जागा, कमी दृश्यमानता आणि हेलिपॅडवरील वाढती वाहतूक यामुळे हवाई सुरक्षेसमोर अनेक आव्हाने निर्माण होतात. या दुर्घटनेमुळे नेपाळमधील हेलिकॉप्टर वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
एकीकडे पर्यटन आणि गिर्यारोहणासाठी जगभरातून पर्यटक नेपाळमध्ये येत असताना दुसरीकडे अशा दुर्घटनांमुळे हवाई प्रवासाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या अपघाताचे नेमके कारण काय, सुरक्षेच्या नियमांचे पालन झाले होते का आणि या दुर्घटनेसाठी जबाबदार कोण, हे तपासातून स्पष्ट होणार आहे.



