गंगोत्री महामार्गावर भीषण दुर्घटना! सात भाविकांची इनोव्हा शेकडो फूट खोल दरीत कोसळून भागीरथी नदीत बुडाली

गंगोत्री धामाच्या दर्शनासाठी जात असताना काळाचा घाला; उत्तराखंडमधील अपघाताने खळबळ
उत्तरकाशी : उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. गंगोत्री धामाच्या दर्शनासाठी निघालेल्या गुजरातमधील सात भाविकांची इनोव्हा कार शेकडो फूट खोल दरीत कोसळून थेट भागीरथी नदीत बुडाली. या दुर्घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गुजरातमधील सात भाविक इनोव्हा कारने गंगोत्री धामाच्या दर्शनासाठी जात होते. प्रवासादरम्यान उत्तरकाशी जिल्ह्यातील गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार खोल दरीत कोसळली. शेकडो फूट खाली असलेल्या भागीरथी नदीत कार बुडाल्याने बचावकार्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. नदीच्या प्रवाहामुळे तसेच अपघाताची जागा दुर्गम असल्याने बचावकार्य कठीण ठरत आहे.
दरम्यान, या दुर्घटनेत सातही भाविकांच्या प्रकृतीबाबत आणि त्यांच्या सुरक्षिततेबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. प्रशासनाकडून बचावकार्य आणि पुढील तपासाबाबत माहिती घेतली जात आहे.
गंगोत्री धामाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या प्रवासावर अशा प्रकारे अपघाताचे संकट कोसळल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.



