बदली मनासारखी न झाल्याने पोलीस कर्मचाऱ्याचा संताप! थेट पोलीस आयुक्तांच्या बंगल्याचे गेट कारने तोडण्याचा प्रयत्न

पुण्यात पोलीस दलात खळबळ; अमोल भिसे यांच्याकडून शासकीय बंगल्यात कार घुसवण्याचा प्रयत्न, कर्मचाऱ्याला निलंबित करून विभागीय चौकशी सुरू
पुणे : बदली मनासारखी झाली नाही म्हणून एका पोलीस कर्मचाऱ्याने थेट पोलीस आयुक्तांच्या शासकीय बंगल्यालाच लक्ष्य केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. नाराज पोलीस कर्मचारी अमोल भिसे यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या शासकीय निवासस्थानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर कार धडकवून गेट तोडत आत घुसण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. संबंधित कर्मचाऱ्याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासह निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलीस दलात अलीकडेच अंतर्गत बदल्या करण्यात आल्या होत्या. या बदल्यांमध्ये अमोल भिसे यांना खराडी पोलीस ठाण्यात नियुक्ती हवी होती. मात्र, त्यांच्या पूर्वीच्या सेवाविषयक नोंदी लक्षात घेऊन त्यांची मागणी मान्य करण्यात आली नाही. यामुळे ते नाराज होते. याच नाराजीतून त्यांनी थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेण्याचे ठरवले.
सायंकाळी सुमारे पावणेसहा वाजण्याच्या सुमारास अमोल भिसे हे पोलीस आयुक्तांच्या शासकीय बंगल्यावर कार घेऊन पोहोचले. तेथे त्यांनी सुरक्षा रक्षकांकडे पोलीस आयुक्तांना भेटण्याचा आग्रह धरला. मात्र, सुरक्षा रक्षकाला त्यांच्या तोंडातून मद्याचा वास येत असल्याचे जाणवले. त्यावेळी पोलीस आयुक्त कार्यालयात असल्याने त्यांना तेथे जाऊन भेटण्याची सूचना करण्यात आली.
यानंतर भिसे यांनी आपली कार मागे घेत फुटपाथजवळ उभी केली. काही वेळ थांबल्यानंतर त्यांनी अचानक भरधाव वेगाने कार चालवत बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या गेटला धडक दिली. गेट तोडून आत घुसण्याचा प्रयत्न होताच सुरक्षा रक्षक आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला. त्यांनी भिसे यांना कारमधून बाहेर काढून ताब्यात घेतले.
या प्रकरणी गार्ड इन्चार्ज यांच्या तक्रारीवरून अमोल भिसे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना ससून रुग्णालयात पाठवण्यात आले होते. मात्र, तेथे डॉक्टरांशी वाद घातल्याने त्यांच्याविरोधात कलम ३५३ अंतर्गत आणखी एक गुन्हा दाखल झाल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, अमोल भिसे यांच्या पूर्वीच्या सेवाविषयक नोंदीही या प्रकरणात चर्चेत आल्या आहेत. ऑक्टोबर २०२५ मध्ये खराडी येथे नियुक्तीवर असताना भांडणाच्या प्रकरणात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले होते. जानेवारी २०२६ मध्ये त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले होते. त्यांच्या सेवाविषयक नोंदींमध्ये मानसिक तणाव, मद्यपानाची सवय आणि भांडणासंदर्भातील उल्लेख असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेची गंभीर दखल घेत अमोल भिसे यांना पुन्हा निलंबित करण्यात आले असून, त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. बदलीच्या नाराजीतून थेट पोलीस आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावर कार धडकवण्यापर्यंत गेलेल्या या प्रकारामुळे पोलीस दलातील शिस्त, अंतर्गत प्रशासन आणि कर्मचाऱ्यांच्या वर्तनाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.



