AMCActionAmravaticitynewslatestnewss breakingnews

मरणासन्न अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या निराधाराला ‘आधार’चा मदतीचा हात; अमरावतीत माणुसकीचे दर्शन!

इर्विन चौकात दोन-तीन दिवस अन्न-पाण्याविना पडले होते लाठीवाले; आधार निवारा केंद्राच्या पथकाने केले रेस्क्यू, स्वच्छता आणि उपचारानंतर चेहऱ्यावर फुलले हास्य

अमरावती : रस्त्यावर निराधार अवस्थेत मृत्यूशी झुंज देणाऱ्या एका व्यक्तीला अमरावती महानगरपालिकेच्या आधार शहरी बेघर निवारा केंद्राने मदतीचा हात देत नवजीवनाची आशा दिली आहे. इर्विन चौक परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अन्न-पाण्याविना मरणासन्न अवस्थेत पडलेल्या लाठीवाले यांची माहिती मिळताच आधार केंद्राच्या पथकाने तातडीने धाव घेत त्यांचे बचावकार्य केले. या संवेदनशील उपक्रमातून पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन घडले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लाठीवाले हे गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र, अचानक रुग्णालय सोडल्यानंतर ते रस्त्यावर भटकू लागले. इर्विन चौक परिसरात मिळेल ते खाऊन दिवस काढणाऱ्या लाठीवालेंची प्रकृती हळूहळू खालावत गेली. गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्यांना अन्न तर सोडाच, साधे पिण्याचे पाणीदेखील मिळाले नव्हते. अखेर भूक, तहान आणि अशक्तपणामुळे ते रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत पडले होते.

याचदरम्यान सामाजिक कार्यकर्ते रूपम सिंग यांचे लक्ष त्यांच्याकडे गेले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीने आधार शहरी बेघर निवारा केंद्र, बडनेरा येथील पथकाशी संपर्क साधला. माहिती मिळताच केंद्राचे पथक इर्विन चौकात दाखल झाले. लाठीवाले यांची अवस्था अत्यंत दयनीय होती. शरीरावर मोठ्या प्रमाणात घाण साचली होती आणि ते पूर्णपणे शुद्ध हरपलेल्या अवस्थेत होते.

पथकाने कोणताही विलंब न करता त्यांना सुरक्षितपणे उचलून प्रथम पिण्याचे पाणी दिले. त्यांनी एकाच वेळी सुमारे एक ते दोन लिटर पाणी प्यायल्याची माहिती केंद्राकडून देण्यात आली. त्यानंतर प्राथमिक मदत करून त्यांना आधार निवारा केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे त्यांची दाढी आणि केस कापण्यात आले. कोमट पाण्याने स्वच्छ आंघोळ घालून त्यांना स्वच्छ कपडे आणि पोटभर गरम जेवण देण्यात आले.

काही वेळापूर्वी रस्त्यावर अत्यंत दयनीय अवस्थेत पडलेल्या लाठीवाले यांच्या चेहऱ्यावर आता समाधानाचे हास्य फुलले आहे. निवारा केंद्रातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या सेवेमुळे त्यांना सुरक्षित निवारा आणि मायेचा आधार मिळाला आहे. एका निराधार व्यक्तीला सन्मानाने जगण्याची नवी उमेद देणाऱ्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हे संपूर्ण बचावकार्य अमरावती महानगरपालिका आयुक्त मंगेश गोंदावले, उपायुक्त योगेश पिठे आणि सहाय्यक आयुक्त धनंजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. आधार केंद्राच्या व्यवस्थापिका ज्योती राठोड, प्रकल्प व्यवस्थापक राजीव बसवनाथे तसेच काळजीवाहक रोहित घोंगडे, किशोर मरकाम आणि विलास थोरात यांनी या कार्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

रस्त्यावर निराधार अवस्थेत पडलेल्या व्यक्तीकडे दुर्लक्ष न करता त्याला मदतीचा हात देणारे सामाजिक कार्यकर्ते रूपम सिंग आणि आधार निवारा केंद्राच्या संपूर्ण पथकाचे कौतुक होत आहे. अमरावती महानगरपालिकेचा हा अभिनव उपक्रम केवळ एका व्यक्तीला निवारा देणारा नसून समाजातील माणुसकी आणि संवेदनशीलतेचा जागर करणारा ठरला आहे.

माणुसकी अजूनही जिवंत आहे; गरज आहे ती फक्त मदतीचा हात पुढे करण्याची!

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button