
आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वात अमरावतीतून कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग; पदाधिकारी, नगरसेवक आणि नगरसेविकांची उपस्थिती
अमरावती : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज नागपूर येथील यशवंत स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकशाही वाचवा, अराजकता थांबवा’ या भव्य मोर्चात सहभागी होण्यासाठी अमरावतीतून युवा स्वाभिमान पक्षाचे हजारो कार्यकर्ते रवाना झाले आहेत. युवा स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वात हा कार्यकर्त्यांचा ताफा नागपूरच्या दिशेने मार्गस्थ झाला.

या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच अमरावती येथील युवा स्वाभिमान पक्षाच्या मुख्य कार्यालयात मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक आणि नगरसेविका एकत्रित झाले होते. मोर्चात सहभागी होण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. पक्षाच्या झेंड्यांसह आणि घोषणांनी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वाखाली अमरावती जिल्ह्यातून तब्बल ५ हजार कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होण्यासाठी नागपूरला रवाना झाल्याची माहिती देण्यात आली. दुपारी १२ वाजताच्या सुमारास हा ताफा नागपूर येथील यशवंत स्टेडियमवर पोहोचणार असल्याचे सांगण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चाच्या माध्यमातून लोकशाहीचे रक्षण आणि अराजकतेविरोधात जनजागृती करण्याचा संदेश दिला जाणार आहे. या आंदोलनात युवा स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवण्याची तयारी केली आहे.
दरम्यान, या मोर्चातील सहभाग, त्यामागील भूमिका आणि आंदोलनाचा उद्देश यासंदर्भात युवा स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी मोर्चाबाबत आपली भूमिका स्पष्ट करत कार्यकर्त्यांच्या सहभागाबाबतही माहिती दिली.



