बुलढाण्यात नवीन विहिरी आणि बोअरवेल खोदण्यावर बंदी; जलप्रकल्पांतून पाणी उपशालाही लगाम!

अल्प पावसामुळे भूजल पातळीत मोठी घट; आगामी उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांचे कठोर आदेश; स्विमिंग पूल चालवण्यावरही बंदी.
बुलढाणा : जिल्ह्यात यंदा अल्प पर्जन्यमान झाल्यामुळे भूजल पातळीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे आगामी उन्हाळ्यात नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, तसेच पिण्याच्या पाण्याचे उपलब्ध स्रोत सुरक्षित राहावेत, यासाठी बुलढाणा जिल्हा प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून संपूर्ण जिल्ह्यात नवीन विहिरी व बोअरवेल खोदण्यासह जलप्रकल्पांमधून पाणी उपसा करण्यावर निर्बंध लागू केले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी ३ नोव्हेंबर रोजी यासंदर्भातील आदेश जारी केले असून, त्यानुसार पिण्याच्या पाण्याचे स्रोत केवळ मानवी वापर आणि पशुधनासाठी आरक्षित ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांपासून ५०० मीटरच्या परिसरात नवीन खासगी किंवा व्यावसायिक विहीर अथवा बोअरवेल खोदण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
याशिवाय जलप्रकल्पांमधून पाणी उपसा करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. तसेच पाण्याचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी जलतरण तलाव अर्थात स्विमिंग पूल सुरू ठेवण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. या निर्णयामुळे पिण्याच्या पाण्याच्या उपलब्ध साठ्याचे संरक्षण करण्यास मदत होणार असून, उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
अल्प पर्जन्यमानामुळे भूजल साठ्यावर निर्माण झालेला ताण लक्षात घेता प्रशासनाने हा प्रतिबंधात्मक निर्णय घेतला आहे. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देत उपलब्ध जलस्रोतांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्याचा या आदेशामागील उद्देश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिक, व्यावसायिक आणि संबंधित संस्थांनी प्रशासनाच्या आदेशांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी कितपत होते, याकडे आता जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
सिटी न्यूज प्रतिनिधी : गजानन राऊत, बुलढाणा.



