citynewsWeather Report

मुरासू चक्रीवादळाचा आंध्र प्रदेशला तडाखा; ताशी १२० किमी वेगाने वारे, अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती

शेकडो वीजखांब कोसळले, हजारो झाडे उन्मळून पडली; किनारपट्टीवरील जनजीवन विस्कळीत, पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट

अर्णभ चक्रीवादळाचा प्रभाव ओसरत नाही तोच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मुरासू चक्रीवादळाने आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारपट्टीला जोरदार तडाखा दिला आहे. ताशी १०० ते १२० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागांत मोठे नुकसान झाले आहे. बापटला, कृष्णा, गुंटूर, प्रकाशम आणि नेल्लोर या जिल्ह्यांना चक्रीवादळाचा सर्वाधिक धोका असल्याने रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली असून शेकडो वीजखांब कोसळले, तर हजारो झाडे उन्मळून पडल्याने रस्ते आणि महामार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. या चक्रीवादळाची भीषणता दर्शवणारे थरारक व्हिडिओही समोर आले आहेत.

मुरासू चक्रीवादळाचा सर्वाधिक प्रभाव आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारपट्टीवरील भागांमध्ये जाणवत आहे. बापटला, कृष्णा, गुंटूर, प्रकाशम आणि नेल्लोर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागांत ताशी १०० ते १२० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः बापटला आणि कृष्णा जिल्ह्यांच्या किनारपट्टीवर एक ते दीड मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून समुद्राचे पाणी किनारी वस्त्यांमध्ये शिरण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे.

बापटला परिसरातून समोर आलेल्या दृश्यांमधून चक्रीवादळाच्या तीव्रतेचा अंदाज येत आहे. जोरदार वाऱ्यांमुळे झाडे उन्मळून पडत असून अनेक ठिकाणी घरांचे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. दुसरीकडे, प्रकाशम जिल्ह्यात मुसळधार पावसाने परिस्थिती अधिक गंभीर केली आहे. सखल भागांमध्ये पाणी साचल्याने रस्ते जलमय झाले असून काही वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याची माहिती आहे. ओंगोल परिसरालाही चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे.

वादळी वाऱ्यांचा सर्वाधिक फटका वीज आणि वाहतूक व्यवस्थेला बसला आहे. बापटला आणि प्रकाशम जिल्ह्यांमध्ये शेकडो वीजखांब वाकले किंवा कोसळले असून अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला आहे. हजारो झाडे रस्त्यांवर कोसळल्याने प्रमुख महामार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. किनारपट्टीवर उभ्या असलेल्या अनेक बोटींचेही नुकसान झाले असून काही बोटी समुद्राच्या लाटांसोबत वाहून गेल्याची दृश्य समोर आली आहेत. ओंगोल परिसरातील नुकसानीचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत असून चक्रीवादळाच्या विध्वंसक स्वरूपाची कल्पना त्यातून येत आहे.

दरम्यान, राज्यावरील चक्रीवादळाचे संकट लक्षात घेता मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी तातडीची आढावा बैठक घेतली. परिस्थितीचा आढावा घेत त्यांनी संबंधित प्रशासकीय यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश दिले आहेत. किनारपट्टीवरील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवणे, संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत मदत व बचावकार्य प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

एकीकडे मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे ताशी १२० किलोमीटर वेगाने वाहणारे वादळी वारे यामुळे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. चक्रीवादळाचा प्रभाव आणखी किती काळ कायम राहणार, नुकसान किती वाढणार आणि प्रशासनाकडून मदत व बचावकार्य किती प्रभावीपणे राबवले जाणार, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button