agriculturecitynewsLatest NewsMaharashtraWashim

कामरगाव नाफेड केंद्रावर ‘कमिशन’चा खेळ? व्यापाऱ्यांचा माल पहाटेच खरेदी, शेतकऱ्यांना मात्र रिकाम्या हाताने परत!

वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील नाफेड खरेदी केंद्रावर मोठा गैरप्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. शासनाच्या नियमांना डावलत केंद्रावर पहाटेच्या वेळेत व्यापाऱ्यांचा माल खरेदी केला जात असून, नोंदणीकृत शेतकऱ्यांना मात्र “बारदाना संपला” असे सांगून परत पाठवले जात असल्याने संतापाची लाट उसळली आहे.

शासनाने नाफेड खरेदीची अधिकृत वेळ सकाळी १० वाजता निश्चित केली आहे. मात्र, कामरगाव केंद्रावर सकाळी ६ ते १० या वेळेतच व्यापाऱ्यांचा माल मोजला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, या व्यवहारासाठी प्रति क्विंटल २०० ते २५० रुपये अवैधरित्या घेतले जात असल्याचाही धक्कादायक आरोप समोर आला आहे.

आज सकाळी शेतकरी राजेश दिगडे आणि इतर काही शेतकरी केंद्रावर पोहोचले असता, हा प्रकार प्रत्यक्ष त्यांच्या निदर्शनास आला. पहाटेपासून व्यापाऱ्यांचे ट्रॅक्टर व माल केंद्रात घेतला जात होता. मात्र, अधिकृत वेळेनंतर आलेल्या नोंदणीकृत शेतकऱ्यांना “बारदाना संपला”, “कट्टे नाहीत” अशी कारणे देत परत पाठवण्यात आले.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हा प्रकार केवळ वेळेच्या नियमभंगापुरता मर्यादित नाही. काही व्यापारी इतरांच्या सातबाऱ्यांचा वापर करून माल विकत असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. त्यामुळे केंद्रावर मोठ्या प्रमाणात बनावट नोंदी आणि दलालीचे रॅकेट सुरू असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या प्रकरणी शेतकऱ्यांनी केंद्र चालक विद्याधर खाडे यांना जाब विचारला असता, त्यांनी उद्धटपणे उत्तर देत “तक्रार केली तरी माझं काही होणार नाही” अशी भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

संतप्त शेतकऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज, नोंदवही आणि सातबाऱ्यांची तपासणी केल्यास संपूर्ण गैरप्रकार उघडकीस येईल, असा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.

दरम्यान, प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. आता या गंभीर आरोपांवर प्रशासन काय भूमिका घेते, शेतकऱ्यांना न्याय मिळतो का, की नाफेड केंद्रावरील ‘कमिशनचा खेळ’ असाच सुरू राहतो, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button