नागपुरात जुगार अड्ड्यावर इमामवाडा पोलिसांची धाड; सात जणांना अटक

सिरसपेठमधील स्वीपर कॉलनीत कारवाई; ६४ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
नागपूर : शहरातील सिरसपेठ परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर इमामवाडा पोलिसांनी छापा टाकून सात जणांना रंगेहाथ पकडले. २८ ऑक्टोबरच्या रात्री स्वीपर कॉलनी परिसरात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल आणि दुचाकीसह एकूण ६४ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुप्त माहितीच्या आधारे छापा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिरसपेठ येथील गायधने चक्कीजवळ शेखर जुगेल यांच्या घरी काही व्यक्ती पैशांची बाजी लावून ताशपत्त्यांवर जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक अजय कुंवर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पंचांसमक्ष छापा टाकला. यावेळी रितेश जुगेल (३९), अनुप आंबेकर (५८), अरमान मोगरे (२८), दुर्गाप्रसाद बक्सरे (५५), सुनील जुगेल (४८), योगेश शुक्लावार (४२) आणि बबलू मनपिया (५२), सर्व राहणार सिरसपेठ, हे जुगार खेळताना आढळले.
रोख रकमेसह मोबाईल आणि दुचाकी जप्त
पोलिसांनी घटनास्थळावरून ४ हजार १०० रुपये रोख, ५२ ताशपत्ते, एक मोबाईल फोन आणि एक ॲक्टिवा दुचाकी असा एकूण ६४ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा
या प्रकरणी इमामवाडा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४ आणि ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धनराज काकडे करीत आहेत.
बाईट : जयवंत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, इमामवाडा पोलीस ठाणे
सिटी न्यूज | नागपूर



