citynewsLatest NewsMaharashtraNagpur

ओबीसींच्या जातिनिहाय जनगणनेसाठी नागपुरात विराट महामोर्चा; शहीद चौक ते महालपर्यंत समाजाचा एल्गार

जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी; अधिकृत जात यादी आणि अचूक इम्पिरिकल डेटा संकलित करण्यावर भर

नागपूर : ओबीसी समाजाची स्वतंत्र आणि प्रमाणित जातिनिहाय जनगणना करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी नागपुरात विराट महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शहीद चौक, इतवारी येथून या महामोर्चाला सुरुवात होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक, महाल येथे त्याची सांगता होणार आहे. या मोर्चाच्या माध्यमातून ओबीसी समाजाच्या विविध मागण्या मांडण्यात येत आहेत.

1931 च्या जनगणनेचा संदर्भ देत देशातील ओबीसी समाजाची लोकसंख्या 52 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचा दावा आंदोलकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे ओबीसी समाजाची स्वतंत्र आणि अधिकृत जातिनिहाय जनगणना करून लोकसंख्येची अचूक माहिती समोर आणावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

तसेच आगामी जनगणनेच्या प्रपत्रामध्ये ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकाना ठेवण्यात यावा, अधिकृत जात यादी निश्चित करण्यात यावी आणि अचूक इम्पिरिकल डेटा संकलित करण्यात यावा, अशा मागण्याही आंदोलकांनी पुढे केल्या आहेत.

ओबीसी समाजाच्या लोकसंख्येची अधिकृत आकडेवारी उपलब्ध झाल्यास समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीचे योग्य आकलन होण्यास मदत होईल, अशी भूमिका आंदोलकांकडून मांडण्यात येत आहे.

जातिनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी नागपुरातील या महामोर्चातून ओबीसी समाजाने एकजुटीचे प्रदर्शन केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button