बडनेरा पोलिसांची वाहनचोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात यश; २६ वर्षीय आरोपी अटकेत

दत्तापूर येथून चोरी केलेली कार बडनेऱ्यात फिरताना आढळली; लोखंडी रॉड, मोबाईलसह वाहन जप्त
अमरावती : वाहनचोरीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात बडनेरा पोलिसांना यश आले आहे. चोरीची कार घेऊन फिरत असताना एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले. विक्रम कृपाप्रसाद नादणे (वय २६, रा. वाकी रायपूर, तालुका व जिल्हा अमरावती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
गस्ती दरम्यान संशयित कार आढळली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे ४.५० वाजताच्या सुमारास बडनेरा पोलीस ठाण्याचे पथक गस्तीवर होते. यावेळी कौशल्य मोबाईल शॉपीसमोरील बसस्थानक परिसरात एक संशयित व्यक्ती कार घेऊन फिरताना दिसली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव विक्रम नादणे असल्याचे सांगितले.
दत्तापूर येथून कार चोरी केल्याची कबुली
पोलिसांनी केलेल्या तपासणीत आरोपीकडून एक लोखंडी रॉड, ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन आणि काळ्या रंगाची स्लेंडर कार क्रमांक MH 27 AX 3656 असा मुद्देमाल मिळून आला. चौकशीदरम्यान संबंधित कार दत्तापूर, धामणगाव रेल्वे येथून चोरी केल्याचे आरोपीने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी दत्तापूर पोलीस ठाण्यात अप क्रमांक ३२५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल आहे. तसेच बडनेरा परिसरात चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याच्या आरोपावरून आरोपीविरुद्ध बडनेरा पोलीस ठाण्यात अप क्रमांक ७०२/२०२६, कलम १२२ महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त परिमंडळ १ यशवंत सोळंके, सहायक पोलीस आयुक्त फ्रेजरपुरा विभाग नयन अलुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
बडनेरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलट आणि पोलीस उपनिरीक्षक अनिल सावकर यांच्यासह पोलीस पथकातील कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
सिटी न्यूज | अमरावती



