नागपुरात १.१० लाखांचा प्रतिबंधित तंबाखू साठा जप्त; एकाला अटक

कसाबपुऱ्यात जमातेउलमा कार्यालयाजवळ पोलिसांचा छापा; मुख्य पुरवठादाराचा शोध सुरू
नागपूर : शहरात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात तहसील पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे कसाबपुरा परिसरातील जमातेउलमा कार्यालयाजवळ छापा टाकून पोलिसांनी एकूण १ लाख १० हजार रुपयांचा प्रतिबंधित तंबाखूचा साठा जप्त केला. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी फरार आहे.
भाड्याच्या घरात साठवणूक करून विक्री
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तहसील पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाला गस्तीदरम्यान प्रतिबंधित तंबाखूची साठवणूक आणि विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने कसाबपुरा परिसरात छापा टाकला. इकबाल अंसारी यांच्या घरात भाड्याने राहणारा मुजम्मिल ऊर्फ काऊ अहमद वकील हा मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा करून विक्री करत असल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी त्याला अटक करून तंबाखूचा साठा जप्त केला.
हसनबागमधील पुरवठादाराच्या घरावरही छापा
चौकशीदरम्यान मुजम्मिलने हा माल हसनबाग येथील हर्षद ऊर्फ गोलू शेख याच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी हर्षदच्या घरावरही छापा टाकला. मात्र, तो फरार असल्याचे आढळले. त्याच्या घरातून ५६ हजार रुपयांचा प्रतिबंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला.
दोन्ही ठिकाणांवरील कारवाईत पोलिसांनी एकूण १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
अन्न व औषध प्रशासनाच्या निरीक्षक शीतल देशपांडे यांच्या तक्रारीवरून तहसील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य पुरवठादार आणि फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.
बाईट : संजय मेंढे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तहसील पोलीस ठाणे
सिटी न्यूज | नागपूर



