मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांचा ७३ दिवसांपासून लढा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

वन विभागाची २०२३ मधील पेसा भरती तातडीने राबविण्याची मागणी; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने
अमरावती : वन विभागाची २०२३ मध्ये जाहीर करण्यात आलेली पेसा भरती तातडीने पूर्ण करून नियुक्त्या देण्यात याव्यात, या मागणीसाठी मेळघाटातील आदिवासी विद्यार्थी गेल्या ७३ दिवसांपासून अमरावती येथील वन विभागाच्या मुख्य कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाला बसले आहेत. मात्र, अद्याप शासन आणि स्थानिक प्रशासनाकडून मागण्यांची दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.
७३ दिवसांच्या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
दीर्घकाळ आंदोलन करूनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने संतप्त झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांनी वन विभागाच्या कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.
पेसा भरती तातडीने पूर्ण करण्याची मागणी
वन विभागाची २०२३ मधील पेसा भरती प्रक्रिया तातडीने राबवून पात्र उमेदवारांना न्याय द्यावा, तसेच मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय थांबवावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
गेल्या ७३ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनानंतरही निर्णय न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी वाढत असल्याचे चित्र आहे. शासनाने या प्रश्नात तातडीने हस्तक्षेप करून भरतीबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
बाईट : हिराचंद कासदेकर
आता आदिवासी विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाची राज्य शासन आणि प्रशासन किती गांभीर्याने दखल घेते आणि पेसा भरतीबाबत काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सिटी न्यूज | अमरावती



