महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी मोदी हॉस्पिटलला दिली अचानक भेट – अनुपस्थित कर्मचाऱ्यांना नोटीस देण्याचे आदेश

अमरावती : अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी नुकतीच मोदी हॉस्पिटलला अचानक भेट देत रुग्णसेवा, स्वच्छता आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती यांची सविस्तर पाहणी केली.
या भेटीत आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी ड्युटीवर असतांनाही अनुपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांकडे विशेष लक्ष केंद्रित केले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना अशा कर्मचाऱ्यांना त्वरित “कारणे दाखवा” नोटीस देण्याचे स्पष्ट आदेश दिले. हा निर्णय रुग्णालयातील शिस्त व कार्यक्षमता सुधारण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच, आयुक्तांनी रुग्णालयातील स्वच्छता, वैद्यकीय सुविधा व रुग्णसेवेच्या दर्ज्याचा आढावा घेतला. आवश्यक तेथे तत्काळ सुधारणा करण्याचे निर्देश देत, रुग्णसेवा अधिक प्रभावी आणि लोकाभिमुख व्हावी यावर त्यांनी भर दिला.
शासनाच्या आरोग्यसेवा धोरणानुसार, सार्वजनिक रुग्णालयांत शिस्तबद्ध सेवा देणे अत्यावश्यक आहे, आणि त्यासाठी कठोर पावले उचलली जातील, असे संकेतही त्यांनी दिले.
या भेटी दरम्यान उपायुक्त योगेश पिठे उपस्थित होते.



