‘आधार’ शहरी बेघर निवारा केंद्रास अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची सदिच्छा भेट

बडनेरा : बडनेरा अमरावती महानगरपालिकेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या ‘आधार’ शहरी बेघर निवारा केंद्राला महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी निवाऱ्यात वास्तव्यास असलेल्या वृद्ध, दिव्यांग आणि मनोरुग्ण बांधवांची सखोल चौकशी केली. केंद्रातील स्वच्छता, सेवा-सुविधा आणि व्यवस्थापनाचे त्यांनी विशेष कौतुक केले. यावेळी आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी निवाऱ्यात दैनंदिन आरोग्य तपासणी व डॉक्टरांची नियमित भेट सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले. तसेच निवाऱ्यातील मोकळ्या जागेत परसबाग (किचन गार्डन) तयार करण्याबाबतही सूचना दिल्या. ‘आधार’ केंद्र हे सामाजिक देणगीदारांच्या सहकार्याने चालविले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केले आणि भविष्यात आवश्यक त्या सर्व गोष्टींचा पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.
या भेटीप्रसंगी उपायुक्त योगेश पिठे, सहाय्यक आयुक्त भूषण पुसदकर, भूषण बाळे, प्रफुल ठाकरे, निवारा संचालक राजीव बसवनाथे, व्यवस्थापिका ज्योती राठोड, काळजीवाहक विलास थोरात, सदानंद ठाकरे आणि रोहित घोंगडे आदी उपस्थित होते.
महानगरपालिकेच्या वतीने अशा उपक्रमांद्वारे समाजातील दुर्बल घटकांसाठी शाश्वत आणि सन्मान्य निवाऱ्याची उपलब्धता करून देण्याचा प्रयत्न होत आहे.



