Amravati GramincitynewsLatest NewsMaharashtraMelghat

मेलघाटच्या टेमली गावात मध्यरात्री भीषण अग्नितांडव; ७० वर्षीय वृद्धाचा आगीत होरपळून मृत्यू

स्वतःच्या किराणा दुकानात झोपले असताना दुर्घटना; जोरदार पावसामुळे आगीची माहिती उशिराने मिळाली

मेलघाट | धारणी | City News

मेलघाटच्या टेमली गावात मध्यरात्री भीषण अग्नितांडव घडले. स्वतःच्या किराणा दुकानात झोपलेल्या ७० वर्षीय शालिकराम राजाराम भिलावेकर यांचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. विशेष म्हणजे घटना घडली त्यावेळी परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने आगीची माहिती गावकऱ्यांना उशिराने मिळाली.

धारणीपासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या टेमली गावात रात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शालिकराम भिलावेकर हे नेहमीप्रमाणे आपल्या किराणा दुकानात झोपले होते. याचदरम्यान अचानक दुकानाला आग लागली.

पाहता पाहता आगीने संपूर्ण दुकानाला वेढा दिला आणि दुकानातील साहित्य जळून खाक झाले. दुकानात झोपलेले शालिकराम भिलावेकर आगीत अडकले. या दुर्घटनेत त्यांचा होरपळून मृत्यू झाला.

घटना घडली त्यावेळी परिसरात जोरदार पाऊस सुरू होता. त्यामुळे आगीची माहिती गावातील नागरिकांना तत्काळ मिळू शकली नाही. नागरिकांना घटनेची माहिती मिळेपर्यंत दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते आणि शालिकराम भिलावेकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

दरम्यान, या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीमागील कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. धारणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास केला जात आहे.

या भीषण दुर्घटनेत ७० वर्षीय शालिकराम भिलावेकर यांचा दुर्दैवी अंत झाल्याने टेमली गावावर शोककळा पसरली आहे. आगीचे नेमके कारण पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button