citynewsLatest NewsMaharashtraMumbai

नालासोपाऱ्यात गणेशमूर्ती कोसळली; भाविकांमध्ये काही काळ गोंधळ, सुदैवाने मोठी दुखापत टळली

पावसापासून मूर्ती वाचवताना तोल गेला; चार ते पाच गणेशभक्त मूर्तीखाली अडकल्याची माहिती, किरकोळ दुखापती

नालासोपारा | City News

नालासोपाऱ्यात गणेशोत्सवाच्या उत्साहाला अचानक दुर्घटनेचे गालबोट लागले. गणेशमूर्तीला पावसापासून वाचवण्याचा प्रयत्न सुरू असतानाच मूर्तीचा तोल गेल्याने ती अचानक खाली कोसळली. या घटनेत चार ते पाच गणेशभक्त मूर्तीखाली अडकल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत मोठी जीवितहानी टळली.

नालासोपारा पश्चिमेतील यशवंत गौरव परिसरात आज संध्याकाळी सहा ते सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गणेशमूर्ती कारखान्यातून मंडळाच्या ठिकाणी नेली जात असताना अचानक पावसाला सुरुवात झाली.

मूर्तीला पावसापासून वाचवण्यासाठी गणेशभक्तांकडून तिच्यावर प्लास्टिक टाकण्याचा प्रयत्न सुरू होता. याचवेळी मूर्तीचा तोल बिघडला आणि काही क्षणांतच ती खाली कोसळली. या दुर्घटनेमुळे घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

मूर्तीखाली चार ते पाच गणेशभक्त अडकल्याचे समोर येताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. नागरिकांच्या मदतीने मूर्ती सुरक्षितपणे उचलण्यात आली आणि त्यानंतर ती मंडळाच्या ठिकाणी नेण्यात आली.

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, तो मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. नालासोपारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास वळवी यांच्या माहितीनुसार, या घटनेत काही जणांना किरकोळ दुखापत झाली असून, कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.

गणेशमूर्ती सुरक्षित करण्याच्या प्रयत्नात ही दुर्घटना घडली. मात्र स्थानिक नागरिकांची तत्परता आणि तातडीने केलेल्या मदतकार्यामुळे मोठी जीवितहानी टळली. गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या मूर्तींची वाहतूक आणि स्थापना करताना सुरक्षिततेची विशेष काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे, हे या घटनेने पुन्हा अधोरेखित केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button