AmravatiAmravatiMahanagarpalikaAmravatiMunicipalCorporationcitynewsLatest NewsMaharashtra

स्वच्छ शहराच्या दाव्यांना तडा! अमरावतीतील अनेक प्रभाग घाणीच्या विळख्यात

साफसफाईकडे दुर्लक्ष, साचलेले नाल्याचे पाणी आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे नागरिक त्रस्त; मनपा प्रशासनाविरोधात संताप

अमरावती प्रतिनिधी

अमरावती शहराला स्वच्छ आणि सुंदर बनविण्याचे दावे महानगरपालिका प्रशासनाकडून सातत्याने केले जात असले, तरी प्रत्यक्षात शहरातील अनेक प्रभागांमध्ये अस्वच्छतेचे गंभीर चित्र पाहायला मिळत आहे. वेळेवर साफसफाई होत नसल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून, संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधी या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

शहरातील अनेक भागांमध्ये सफाई कर्मचारी नियमितपणे येत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. काही ठिकाणी महिन्यातून एकदाच साफसफाई होत असल्याने नाल्यांमधील गाळ, कचरा आणि घाण रस्त्यांवरच पडून राहत आहे. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

प्रभाग क्रमांक १३ मधील अंबापेठ परिसर, सरोज टॉकीज मागील भाग, गुजरात कांती भवन परिसर तसेच जुना कॉटन मार्केट रोडवरील दर्गा परिसरात नाल्याचे पाणी साचून राहत असल्याची गंभीर समस्या नागरिकांनी मांडली आहे. नाल्यांचा निचरा होत नसल्याने हे पाणी थेट रहिवासी भागात जमा होत असून डासांचे प्रमाण वाढण्यासह संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे.

स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा महानगरपालिका प्रशासनाकडे लेखी आणि तोंडी तक्रारी केल्या आहेत. मात्र अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.

विशेष बाब म्हणजे संबंधित दर्गा परिसरात आजपासून उर्स महोत्सवाला सुरुवात होत आहे. या धार्मिक सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता असतानाही परिसरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. उर्सपूर्वी नाल्यांची साफसफाई किंवा साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणतीही प्रभावी कारवाई करण्यात आली नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली.

दरम्यान, चित्रा चौक ते हॉटेल हिंदुस्थान रोड परिसरातही मागील पंधरा दिवसांपासून नाल्यांची साफसफाई झालेली नसल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी नाल्यांमधून काढलेला कचरा देखील उचलण्यात आलेला नसून ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी वाढली असून नागरिकांना दैनंदिन जीवनात अडचणींचा सामना करावा लागत आहे.

नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाने तातडीने या समस्येकडे लक्ष देऊन विशेष स्वच्छता मोहीम राबवावी, साचलेल्या पाण्याचा निचरा करावा आणि कचरा त्वरित हटवावा, अशी मागणी केली आहे.

एकीकडे स्वच्छ शहराचे दावे आणि दुसरीकडे घाणीच्या विळख्यात अडकलेले नागरिक, असे विरोधाभासी चित्र सध्या अमरावती शहरात पाहायला मिळत आहे. आता महानगरपालिका प्रशासन या तक्रारींची कितपत गंभीर दखल घेते आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी कोणती पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button