citynewsLatest NewsMaharashtraSindhudurg

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ‘जलसिंधू’ निवासी संकुल प्रकल्पाचे भूमिपूजन

जलसंपदा विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आधुनिक व सुसज्ज निवास व्यवस्था; दीड वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याच्या सूचना

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी

जलसंपदा विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आधुनिक सुविधा, सुरक्षित वातावरण तसेच दर्जेदार निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात येणाऱ्या ‘जलसिंधू’ निवासी संकुल प्रकल्पाचे भूमिपूजन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी बोलताना पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, ‘जलसिंधू’ निवासी संकुल हा शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण जीवनमान निर्माण करणारा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. या प्रकल्पाचा आराखडा उत्कृष्ट असून बांधकामाची गुणवत्ता सर्वोत्तम राखणे आवश्यक आहे. तसेच हा प्रकल्प नियोजित कालावधीत पूर्ण होणेही तितकेच महत्त्वाचे असल्याने संबंधित यंत्रणांनी संपूर्ण प्रकल्प दीड वर्षाच्या आत दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावा, असे निर्देश त्यांनी दिले.

कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या माध्यमातून साकारल्या जाणाऱ्या या निवासी संकुलामुळे जलसंपदा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सर्व आवश्यक सुविधांनी युक्त, सुरक्षित आणि सुसज्ज निवास व्यवस्था उपलब्ध होणार आहे. या सुविधेमुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन विभागाच्या कामकाजाला अधिक गती मिळेल, असा विश्वासही पालकमंत्री राणे यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, मुख्य अभियंता मिलिंद नाईक, अधीक्षक अभियंता पद्माकर पाटील, कार्यकारी अभियंता अमोल चोपडे, कणकवली पंचायत समितीच्या सभापती हर्षदा वाळके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान कार्यकारी अभियंता अमोल चोपडे यांनी प्रस्तावित निवासी संकुलातील विविध सुविधा, आराखडा आणि प्रकल्पाच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली. प्रकल्पाचे बांधकाम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात येणार असून, दीड वर्षाच्या आत प्रकल्प पूर्ण करून त्याचे लोकार्पणही पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘जलसिंधू’ निवासी संकुल प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आधुनिक, सुरक्षित आणि दर्जेदार निवास व्यवस्थेचा नवा अध्याय सुरू होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button