बांधकामावर पाणी मारताना विजेचा धक्का; 24 वर्षीय सुरक्षारक्षकाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगरातील एमआयडीसी सिडको परिसरातील दुर्दैवी घटना; कुटुंबावर शोककळा
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर शहरातील एमआयडीसी सिडको परिसरात सुरू असलेल्या एका नवीन इमारतीच्या बांधकामावर पाणी मारत असताना विजेचा धक्का लागून 24 वर्षीय सुरक्षारक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. 18) दुपारी घडली. या घटनेमुळे बांधकाम परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृताच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अर्जुन भीमराव निकाळजे (वय 24, मूळ रा. एकतुनी, ता. पैठण, सध्या रा. म्हाडा कॉलनी, छत्रपती संभाजीनगर) असे मृत सुरक्षारक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी सिडको परिसरात एका नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. अर्जुन निकाळजे हे संबंधित कंत्राटदाराकडे सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते. सुरक्षेच्या जबाबदारीसोबतच त्यांच्याकडे बांधकामाला नियमित पाणी मारण्याचे कामही सोपविण्यात आले होते.
गुरुवारी दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास अर्जुन हे नेहमीप्रमाणे बांधकामाच्या ठिकाणी पाणी मारत होते. यावेळी अचानक त्यांचा विजेच्या प्रवाहाशी संपर्क आल्याने त्यांना जोरदार धक्का बसला. विजेचा धक्का इतका तीव्र होता की ते घटनास्थळीच कोसळले.
घटनेची माहिती मिळताच सहकाऱ्यांनी आणि परिसरातील नागरिकांनी त्यांना तातडीने शासकीय घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
अर्जुन निकाळजे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या अकाली निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे.
या घटनेची नोंद एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, विजेचा धक्का नेमका कशामुळे लागला याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. याबाबतची माहिती हवालदार अरविंद मेने यांनी दिली.



