citynewsCrime NewsLatest NewsMaharashtraMaharashtraCrimePune

मैत्रिणीवरून झालेल्या वादाचा दुर्दैवी शेवट; मित्राने घेतला जीव

गोखलेनगरातील थरारक घटना; 12 तासांत तिघे आरोपी पोलिसांच्या ताब्यात

पुणे प्रतिनिधी

पुण्यातील गोखलेनगर परिसरात मैत्रिणीवरून झालेल्या वादातून एका तरुणाचा त्याच्या मित्रानेच साथीदारांच्या मदतीने निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी अवघ्या 12 तासांच्या आत तिघा आरोपींना नवी मुंबईतील रबाळे पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेतले आहे.

खून झालेल्या तरुणाचे नाव हर्षद मच्छिंद्र जाधव (वय 20, रा. गोखलेनगर) असे असून, अभिषेक संतोष पवार (वय 20), प्रथमेश धोत्रे (वय 21) आणि मारुती देवकर (वय 28, तिघेही रा. जनवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षद आणि मुख्य आरोपी अभिषेक पवार हे एकमेकांचे जवळचे मित्र होते. मात्र, एका तरुणीवरून दोघांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू होता. या वादामुळे दोघांमध्ये अनेकदा शाब्दिक चकमकी झाल्या होत्या. काही दिवसांपूर्वी हर्षदने अभिषेकच्या घरी जाऊन गोंधळ घातल्याची तसेच त्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याची माहितीही समोर आली आहे.

या प्रकारामुळे अभिषेक हर्षदवर प्रचंड संतापलेला होता. अखेर या रागातूनच त्याने प्रथमेश धोत्रे आणि मारुती देवकर या साथीदारांच्या मदतीने हर्षदला धडा शिकवण्याचा कट रचला. गुरुवारी (18 जून) पहाटे सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास एकतानगर सोसायटीजवळील भगवान चाळ परिसरात हर्षद आपल्या घरासमोरील रिक्षामध्ये बसून मोबाईल पाहत होता.

याच वेळी आरोपी तेथे पोहोचले आणि त्यांनी हर्षदवर लाकडी दांडके व क्रिकेट बॅटच्या साहाय्याने हल्ला चढवला. या हल्ल्यात हर्षद गंभीर जखमी झाला. स्थानिक नागरिकांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच चतुःश्रृंगी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढत त्यांना नवी मुंबईतील रबाळे परिसरातून अवघ्या 12 तासांत ताब्यात घेतले.

या प्रकरणी मृत हर्षदची आई पौर्णिमा जाधव (वय 40) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिन्ही आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चतुःश्रृंगी पोलीस करीत आहेत.

दरम्यान, क्षुल्लक कारणातून मैत्रीचे वैरात रूपांतर होऊन एका तरुणाचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button