नागपूर झोन-३ पोलिसांची गुन्हेगारांवर धडक मोहीम; २८ सराईत आरोपी तडीपार

१५२ जणांवर बाँडभंगाची कारवाई, ३६ आरोपी कारागृहात; चार मोक्का कारवाया, आणखी तीन प्रस्ताव प्रक्रियेत
नागपूर | प्रतिनिधी
नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या झोन-३ अंतर्गत गुन्हेगारांविरोधातील प्रतिबंधात्मक कारवाईला मोठा वेग आला असून, जुलै २०२६ अखेरपर्यंत २८ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. तसेच बाँडचे उल्लंघन करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करत अनेकांना कारागृहात पाठविण्यात आले आहे. झोन-३ मधील ही कारवाई नागपूर पोलीस आयुक्तालयातील सर्वाधिक असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
झोन-३ पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यापर्यंत एकूण २८ सराईत आरोपींना तडीपार करण्यात आले. तसेच बाँडचे उल्लंघन करणाऱ्या ३६ आरोपींना कारागृहात पाठविण्यात आले असून, विविध प्रकरणांमध्ये आरोपींकडून सुमारे १० लाख रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.
याशिवाय आतापर्यंत १५२ जणांविरुद्ध ब्रीच ऑफ बाँडची कारवाई करण्यात आली असून, ही संख्या नागपूर पोलीस आयुक्तालयातील सर्वाधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले. शरीरावरील गुन्हे (Body Offences) आणि मालमत्तेशी संबंधित गुन्हे (Property Offences) करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर सातत्याने लक्ष ठेवून प्रतिबंधात्मक कारवाई केली जात असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.
गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी झोन-३ मध्ये आतापर्यंत चार मोक्का कारवाया करण्यात आल्या असून, आणखी तीन मोक्का प्रस्ताव प्रक्रियेत असल्याची माहिती देण्यात आली.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि सराईत गुन्हेगारांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी तडीपार, मोक्का आणि इतर प्रतिबंधात्मक कारवायांची मोहीम आगामी काळातही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचे नागपूर पोलिसांनी स्पष्ट केले आहे.



