गोदरी धबधब्यावर पाय घसरून युवकाचा मृत्यू; पावसाळी पर्यटन पुन्हा ठरले धोकादायक

भोकरदन तालुक्यातील दुर्घटनेत २५ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू; धबधब्यावर सुरक्षाव्यवस्था वाढविण्याची मागणी
जालना | प्रतिनिधी
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील प्रसिद्ध गोदरी धबधब्यावर पावसाळी पर्यटनादरम्यान घडलेल्या दुर्दैवी अपघातात २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. धबधब्याच्या वरच्या भागात पाय घसरून खोल दरीत पडल्याने तो गंभीर जखमी झाला होता. मित्रांनी तत्परता दाखवत त्याला खांद्यावरून सुरक्षित ठिकाणी आणले, मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील भादोला येथील आकाश सुनील घन (वय २५) हा आपल्या पाच ते सहा मित्रांसह मंगळवारी धावडा गावाजवळील गोदरी धबधबा पाहण्यासाठी आला होता. धबधब्याच्या वरच्या भागात जात असताना पावसामुळे निसरड्या झालेल्या खडकांवर त्याचा पाय घसरला आणि तो खोल दरीत कोसळला.
घटनेनंतर त्याच्या मित्रांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. गंभीर जखमी झालेल्या आकाशला तब्बल एक किलोमीटर खांद्यावरून वाहून सुरक्षित ठिकाणी आणण्यात आले. त्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिकेची व्यवस्था करून त्याला प्रथम फतेहपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
या दुर्घटनेनंतर गोदरी धबधब्यावर सुरक्षाव्यवस्था अधिक बळकट करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. धोकादायक ठिकाणी इशारा फलक, संरक्षण कठडे तसेच कायमस्वरूपी बचाव पथकाची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, पावसाळ्यात धबधबे आणि निसर्गरम्य स्थळांवर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असल्याने प्रशासनाने सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर अधिक भर देण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.



