Accident NewscitynewsHighwayAccidentLatest NewsMaharashtraNagpurNagpurPolice

मोकाट जनावराला वाचवताना स्कॉर्पिओ पलटी; पाच ते सहा महिला जखमी

नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग : नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. चोरबाहुली गावाजवळ मोकाट जनावराला वाचवण्याच्या प्रयत्नात स्कॉर्पिओ वाहन अनियंत्रित होऊन पलटी झाले. या अपघातात वाहनातील पाच ते सहा महिला जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी देवलापार ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ४० बीई ७२५६ क्रमांकाची स्कॉर्पिओ अयोध्येहून देवदर्शन करून नागपूरच्या दिशेने येत होती. रात्री सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास हे वाहन चोरबाहुली परिसरात पोहोचले. याचवेळी नागपूरकडे येणाऱ्या मार्गावर अचानक मोकाट जनावर आल्याने चालकाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला.

मात्र, जनावराला वाचवताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. स्कॉर्पिओ दुसऱ्या लेनमध्ये जाऊन रस्त्यावर पलटी झाली. या दुर्घटनेत वाहनातील पाच ते सहा महिला जखमी झाल्या. काही जखमींना किरकोळ दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

अपघाताची माहिती मिळताच खुमारी टोल प्लाझाच्या वैद्यकीय विभागातील डॉक्टर हनवत आणि रुग्णवाहिका चालक गणेश बघमारे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना प्राथमिक मदत देत त्यांना रुग्णवाहिकेतून देवलापार ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

दरम्यान, चोरबाहुली परिसरात महामार्गावर मोकाट जनावरांचा वावर वारंवार होत असल्याने वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रात्रीच्या वेळी अचानक रस्त्यावर येणाऱ्या जनावरांमुळे वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण होत आहे.

महामार्गावर मोकाट जनावरांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात. तसेच जनावरे महामार्गावर सोडणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button