कोल्ड स्टोरेज मशीन देण्याच्या नावाखाली ७५ लाखांची फसवणूक!

‘फोनेक्स’ कंपनीच्या माध्यमातून व्यवहार; पैसे घेऊनही मशीन न दिल्याचा आरोप, तीन जणांचा सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात उघड
नागपूर | प्रतिनिधी
नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोल्ड स्टोरेज मशीन देण्याच्या नावाखाली तब्बल ७५ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ‘फोनेक्स’ कंपनीच्या माध्यमातून मशीनची ऑर्डर घेण्यात आली होती. मात्र, पैसे स्वीकारूनही मशीन उपलब्ध करून न दिल्याने तक्रारदाराने पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, प्राथमिक तपासात तीन जणांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.
सुरुवातीला २१ लाखांचा व्यवहार
मिळालेल्या माहितीनुसार, सूर्यनगर परिसरातील रहिवासी अमितकांत अनुपजी मोटवाणी यांनी याप्रकरणी लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आरोपींची ‘फोनेक्स’ नावाची कंपनी असून, या कंपनीच्या माध्यमातून तक्रारदाराला कोल्ड स्टोरेज मशीन देण्याची ऑर्डर घेण्यात आली होती.
या मशीनच्या मोबदल्यात सुरुवातीला २१ लाख रुपये देण्याचे करारानुसार ठरले होते. तक्रारदाराने ही रक्कम दिल्यानंतरही आरोपींकडून मशीन उपलब्ध करून देण्यात आली नाही. त्यानंतर वेगवेगळ्या टप्प्यांत तक्रारदाराकडून आणखी पैसे घेण्यात आल्याचा आरोप आहे.
एकूण ७५ लाख रुपये घेतल्याचा आरोप
मशीन देण्याचे आश्वासन देत आरोपींनी तक्रारदाराकडून आतापर्यंत एकूण ७५ लाख रुपये घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मात्र, रक्कम स्वीकारूनही मशीन न मिळाल्याने तक्रारदाराचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
तीन जणांचा सहभाग असल्याचा प्राथमिक तपासात खुलासा
या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली असता, आर्थिक व्यवहारात तीन जणांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. यामध्ये राहुल पुरुषोत्तम ठाकरे (रा. महाल, कोतवाली) याच्यासह एका महिला आरोपीचा समावेश असल्याची माहिती आहे.
दरम्यान, या व्यवहारात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच तक्रारदाराकडून घेतलेली ७५ लाख रुपयांची रक्कम कुठे वापरण्यात आली, याचा तपास लकडगंज पोलीस करीत आहेत. पैसे घेऊनही मशीन न दिल्याच्या या प्रकरणामुळे व्यावसायिक व्यवहारातील विश्वासार्हतेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.



