AmravatiAmravatiMahanagarpalikaAmravatiMunicipalCorporationcitynewsLatest NewsMaharashtra

दिवाळीत फटाके फोडण्यासाठी अमरावतीत १२ ठिकाणे निश्चित!

वायू आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय; आयुक्त डॉ. मंगेश गोंडावले यांचे नागरिकांना आवाहन

अमरावती, ६ नोव्हेंबर | प्रतिनिधी

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वायू आणि ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी अमरावती महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दिवाळीदरम्यान फटाके फोडण्यासाठी शहरातील पाच झोनमध्ये एकूण १२ सार्वजनिक ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंडावले यांनी यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केला असून, नागरिकांनी निश्चित केलेल्या ठिकाणीच सामूहिकरीत्या फटाके फोडण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले आहे.

माननीय सर्वोच्च न्यायालयात दाखल रिट याचिका क्रमांक ६७२/२०१५ मधील निर्देश आणि फटाक्यांची विक्री व वापरासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील हवेची गुणवत्ता राखणे, प्रदूषणाचे दुष्परिणाम कमी करणे आणि नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

पाच झोनमधील निश्चित केलेली ठिकाणे

महानगरपालिकेच्या उपअभियंत्यांनी शहरातील पाच झोनमध्ये फटाके फोडण्यासाठी सार्वजनिक जागांची निवड केली आहे. त्यामध्ये पुढील ठिकाणांचा समावेश आहे.

झोन क्रमांक १ – रामपुरी कॅम्प

  1. के. वाघमारे चौक मैदान, नवसारी क्रीडा संकुलाजवळ, प्रभाग क्रमांक ३.
  2. बजरंगनगर, संतोषीनगर आणि जयसियारामनगर वस्तीलगतचे मैदान, प्रभाग क्रमांक ५.

झोन क्रमांक २ – राजापेठ

  1. दसरा मैदान.

झोन क्रमांक ३ – दस्तूरनगर

  1. छत्री तलाव पार्कसमोरील मैदान.
  2. वडारपुरा येथील खुले मैदान.

झोन क्रमांक ४ – बडनेरा

  1. स्वामी विवेकानंद क्रीडांगण, फडा कॉलनी, प्रभाग क्रमांक १९, अकोली.
  2. गणेशनगर येथील मोकळे मैदान, प्रभाग क्रमांक २०.
  3. सावता मैदान परिसर, बडनेरा रोड, न्यू कॉलनी, प्रभाग क्रमांक २१ आणि २२.

झोन क्रमांक ५ – भाजीबाजार

  1. महानगरपालिका झोन क्रमांक ५ कार्यालयासमोरील मोकळी जागा.
  2. आनंदनगर चौक, पुलाजवळील परिसर.
  3. आदिवासी वसतिगृहासमोरील मोकळी जागा, वल्लभनगर.

सुरक्षित आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात फटाके फोडल्यामुळे हवेचे आणि ध्वनीचे प्रदूषण वाढण्याची शक्यता असते. त्याचा परिणाम लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच श्वसनासंबंधी त्रास असलेल्या व्यक्तींवर होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी वैयक्तिक ठिकाणी फटाके फोडण्याऐवजी महानगरपालिकेने निश्चित केलेल्या सार्वजनिक जागांचा वापर करावा, असे प्रशासनाने सूचित केले आहे.

शहरातील पर्यावरण स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी तसेच नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी महापालिकेचा हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. आयुक्त डॉ. मंगेश गोंडावले यांनी नागरिकांना प्रशासनाला सहकार्य करून सुरक्षित, संयमित आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button