citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

रात्रगस्तीत पोलिसांची धडक कारवाई; धारदार शस्त्रासह संशयित आरोपी अटकेत

हिंगणा आऊटर रिंग रोडवर कारची तपासणी; सुरा, लाकडी दांडा जप्त, शस्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

नागपूर | प्रतिनिधी

नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या विशेष एस्कॉर्ट पथकाने रात्रगस्तीदरम्यान हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत धारदार शस्त्र बाळगणाऱ्या एका संशयित आरोपीला अटक केली आहे. कारची तपासणी करताना त्यातून लोखंडी धारदार सुरा आणि लाकडी दांडा जप्त करण्यात आला असून, आरोपीविरुद्ध शस्त्र कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशेष एस्कॉर्ट पथक हिंगणा आऊटर रिंग रोडवरील निर्मल ढाबा परिसरात रात्रगस्त करीत असताना संशयावरून एमएच ४० डीई ७५१९ क्रमांकाची अर्टिगा कार थांबवून तिची तपासणी करण्यात आली.

वाहनाची झडती घेतली असता कारमध्ये एक लोखंडी धारदार सुरा आणि लाकडी दांडा आढळून आला. वाहन चालक वृषल राजेंद्र कोराडे (वय २०), रा. आमगाव देवरी, ता. हिंगणा याच्याकडे या शस्त्रांबाबत विचारणा करण्यात आली. मात्र त्याने समाधानकारक उत्तर न दिल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला.

यानंतर विशेष एस्कॉर्ट पथकाने हिंगणा पोलिसांना घटनास्थळी पाचारण करून आरोपी, वाहन आणि जप्त शस्त्रे त्यांच्या ताब्यात दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने शस्त्र बाळगल्याचा संशय व्यक्त करत शस्त्र कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास हिंगणा पोलीस करीत असून, आरोपीकडे शस्त्रे कशासाठी होती आणि त्याचा अन्य कोणत्याही गुन्ह्याशी संबंध आहे का, याचाही तपास सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button