अमरावतीत २६ वर्षीय तरुणाचे संशयास्पद अपहरण; सहा दिवसांपासून बेपत्ता, आईच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा!

आनंदनगर परिसरातील नवनीत ऊर्फ केळू पुरूषोत्तम इंगळे बेपत्ता; बारमध्ये कामासाठी गेल्यानंतर परतलाच नाही, खलापुरी गेट पोलिसांकडून तपास सुरू
अमरावती : शहरातील खलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २६ वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, त्याचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. नवनीत ऊर्फ केळू पुरूषोत्तम इंगळे असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्याच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १४०(३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवनीत इंगळे हा अमरावतीतील आनंदनगर परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहत होता. तो भातकुली रोडवरील ए-वन गड बार अँड रेस्टॉरंट येथे काम करीत असल्याची माहिती तक्रारीत देण्यात आली आहे. १८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ७ वाजता तो नेहमीप्रमाणे घरातून कामावर जाण्यासाठी निघाला. मात्र, दोन-तीन दिवस उलटूनही तो घरी परतला नाही.
त्यानंतर २३ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास बंडू आठवले यांनी नवनीतच्या आईला त्याच्याबाबत विचारणा केली. नवनीत कामावर येत नसल्याचे तसेच तो मागील काही दिवसांपासून दिसला नसल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर कुटुंबीयांनी नातेवाईक आणि परिसरात त्याचा शोध घेतला. मात्र, नवनीतचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही.
अखेर नवनीतच्या आई रेखा पुरुषोत्तम इंगळे यांनी २४ सप्टेंबर रोजी खलापुरी गेट पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. अज्ञात व्यक्तींनी नवनीतचे अपहरण करून त्याला बेकायदेशीररीत्या डांबून ठेवले असावे, असा संशय त्यांनी तक्रारीत व्यक्त केला आहे.
बेपत्ता तरुणाचे वर्णन : नवनीत ऊर्फ केळू पुरूषोत्तम इंगळे, वय २६ वर्षे, बांधा सडपातळ, रंग गोरा, नाक सरळ, डोळे बारीक, केस कुरळे व काळे. उजव्या हातावर नवनीत आणि एमपी अशी नावे गोंदलेली आहेत. अंगात निळ्या रंगाचा हाफ शर्ट, निळ्या रंगाची लोअर पँट असून, हातावर चांदीचे टॅटू असल्याचे तक्रारीत नमूद आहे. उंची अंदाजे पाच फूट दोन इंच आहे.
या प्रकरणी खलापुरी गेट पोलिसांनी अपहरणाच्या संशयावरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तरुण नेमका कुठे गेला, त्याच्यासोबत काय घडले आणि त्याच्या बेपत्ता होण्यामागे कोणाचा सहभाग आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.
दरम्यान, सहा दिवसांपासून मुलाचा ठावठिकाणा लागत नसल्याने कुटुंबीय चिंतेत आहेत. नवनीतचा शोध घेऊन त्याला सुखरूप घरी आणण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.



