मालमत्ता कर थकबाकीदारांवर मनपाची कारवाई; गोल्डन किड्स हायस्कूल आणि अग्रेशन पेट्रोल पंपाला जप्तीच्या नोटिसा

सात दिवसांत थकबाकी न भरल्यास सिलिंगची कारवाई; विशेष वसुली मोहिमेला वेग
अमरावती प्रतिनिधी
अमरावती महानगरपालिकेच्या उत्तर झोन क्रमांक १ अंतर्गत मालमत्ता कर थकबाकीदारांविरोधात विशेष वसुली मोहीम राबविण्यात येत असून, या मोहिमेअंतर्गत दोन प्रमुख आस्थापनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. थकबाकीदारांना जप्तीच्या नोटिसा बजावून सात दिवसांच्या आत थकबाकी भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
उत्तर झोन क्रमांक १ चे सहाय्यक आयुक्त यांच्या आदेशान्वये दिनांक १७ जून २०२६ रोजी ही कारवाई करण्यात आली. यामध्ये गोल्डन किड्स हायस्कूल या शैक्षणिक संस्थेकडे मालमत्ता कराची तब्बल ११ लाख २३ हजार ८०८ रुपयांची थकबाकी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित संस्थेला जप्तीची नोटीस बजावण्यात आली असून, सात दिवसांच्या आत संपूर्ण थकबाकी जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तसेच अग्रेशन पेट्रोल पंपाकडे मालमत्ता कराची ४ लाख २२ हजार ५०६ रुपयांची थकबाकी असल्याचे आढळून आले. त्यांनाही जप्तीची नोटीस बजावण्यात आली असून, निर्धारित मुदतीत थकबाकी न भरल्यास मालमत्तेवर सिलिंगची कारवाई करण्यात येणार असल्याची सूचना देण्यात आली आहे.
महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, नोटीस मिळाल्यानंतरही संबंधितांनी थकबाकीची रक्कम भरली नाही, तर नियमानुसार मालमत्ता जप्तीची पुढील प्रक्रिया राबविण्यात येईल. त्यामुळे सर्व थकबाकीदारांनी तात्काळ मालमत्ता कराचा भरणा करून कठोर कारवाई टाळावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
महानगरपालिकेच्या महसूल वाढीसाठी आणि थकीत कर वसुलीसाठी ही विशेष मोहीम राबविण्यात येत असून, आगामी काळात इतर मोठ्या थकबाकीदारांवरही अशाच प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
सदर कारवाई उत्तर झोन क्रमांक १ अंतर्गत करण्यात आली. यावेळी सहायक क्षेत्रीय अधिकारी केशव ठाकरे, कर निरीक्षक संजय खडसान, श्री माहुरे, सचिन गोहर, जितेंद्र श्रीवास्तव तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.



