AmravaticitynewsCrime NewsLatest NewsMaharashtra

तपोवन टेकडी परिसरात अर्धवट जळालेला मृतदेह सापडला

अमरावती, प्रतिनिधी : अमरावती शहराला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधातून 21 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा आरोप असून, खून केल्यानंतर मृतदेह जाळून पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी आरोपी समाधान इंगळे याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारच्या सुमारास मार्डी रोडवरील तपोवन टेकडी परिसरातील स्मशानभूमीलगतच्या जंगलातून जळाल्याचा तीव्र वास येत असल्याचे एका गुराख्याच्या लक्षात आले. संशय आल्याने त्याने परिसराची पाहणी केली असता एका खड्ड्यात अर्धवट जळालेल्या अवस्थेत तरुणीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर गाडगेनगर पोलिसांना याची माहिती देण्यात आली.

घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा करत तपास सुरू केला. मृतदेहावर गंभीर स्वरूपाच्या जखमा आढळून आल्या असून घटनास्थळावरून एक लोखंडी रॉडही जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे तरुणीची हत्या करून नंतर मृतदेह जाळण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय अधिक बळावला आहे.

तपासादरम्यान मृत तरुणी आणि आरोपी समाधान इंगळे यांच्यात प्रेमसंबंध असल्याची बाब समोर आली. मात्र आरोपीकडून होत असलेल्या त्रासामुळे तरुणीने कुटुंबीयांकडे तक्रार केली होती. दरम्यान, तिचा विवाह येत्या 25 जून रोजी दुसऱ्या युवकासोबत निश्चित झाल्याची माहितीही समोर आली आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, लग्न ठरल्याच्या रागातून आरोपीने तरुणीची हत्या केली. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जंगलातील खड्ड्यात फेकून त्यावर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.

घटनेनंतर मृत तरुणीचे शवविच्छेदन जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आले. या हत्याकांडामुळे शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात भेट देत कुटुंबीयांची सांत्वना केली.

दरम्यान, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी तसेच फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, अशी मागणी मृत तरुणीच्या आई-वडिलांनी केली आहे.

या हत्याकांडामुळे अमरावती शहर हादरले असून, पोलिसांकडून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. तपासातून आणखी कोणते धक्कादायक खुलासे समोर येतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button