AmravatiamravaticitynewsLatest NewsMaharashtraMaharashtra Politicspolitics

अमरावती विधान परिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट; उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानंतर विप्लव बाजोरिया यांची हायकोर्टात धाव

अमरावती | प्रतिनिधी

अमरावती विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे बंडखोर तथा अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरिया यांच्या उमेदवारी अर्जावरून सुरू झालेला वाद आता न्यायालयीन पातळीवर पोहोचला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळल्यानंतर बाजोरिया यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करत निर्णयाला आव्हान दिले आहे. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती प्रफुल्ल खुबलकर यांच्या खंडपीठासमोर सुरू झाली आहे.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी छाननीदरम्यान बाजोरिया यांचा अर्ज रद्द करताना प्रतिज्ञापत्रातील मालमत्तेची माहिती विहित फॉर्म-26 मध्ये सादर न केल्याचा मुद्दा ग्राह्य धरला होता. संबंधित माहिती स्वतंत्र स्वरूपात सादर करण्यात आली असली तरी ती निर्धारित नमुन्यात नसल्याने अर्ज अपात्र ठरविण्यात आला.

निर्णयाची प्रत हाती येताच बाजोरिया यांच्या कायदेशीर पथकाने नागपूर गाठत उच्च न्यायालयात तातडीची याचिका दाखल केली. याचिकेमध्ये उमेदवारी अर्ज रद्द करण्याचा निर्णय कायदेशीरदृष्ट्या चुकीचा आणि अन्यायकारक असल्याचा दावा करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, बाजोरिया यांच्या वकिलांनी निवडणुकीतील इतर चार उमेदवारांच्या उमेदवारी अर्जांच्या प्रतीही मागविल्या आहेत. त्यामुळे न्यायालयीन सुनावणीदरम्यान इतर उमेदवारांच्या अर्जांचीही तपासणी आणि छाननी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या घडामोडींमुळे अमरावती विधान परिषद निवडणुकीतील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले असून राजकीय वातावरण तापले आहे. सर्व पक्षांचे लक्ष आता नागपूर खंडपीठाच्या निर्णयाकडे लागले आहे. न्यायालयाचा निकाल विप्लव बाजोरिया यांच्या उमेदवारीचे भवितव्य ठरवणार असल्याने अमरावतीच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

दरम्यान, सुनावणी सुरू असल्याने या प्रकरणात लवकरच महत्त्वपूर्ण निर्णय येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. न्यायालय बाजोरिया यांना दिलासा देणार की निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button