शिक्षणासोबत आरोग्य, सुरक्षितता आणि सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध : दादाजी भुसे

तोरणमाळच्या दुर्गम डोंगररांगांत शैक्षणिक वर्ष 2026-27 चा उत्साहात शुभारंभ; विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत
नंदुरबार | प्रतिनिधी
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम तोरणमाळ येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 च्या प्रवेशोत्सव आणि आनंदोत्सव कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे स्वागत करताना ते बोलत होते.
धडगाव तालुक्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस आवासीय विद्यालय येथे आयोजित कार्यक्रमात मोठ्या उत्साहात नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार आमश्या पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
शिक्षण हा आदिवासी विकासाचा प्रभावी मार्ग
यावेळी बोलताना मंत्री भुसे म्हणाले की, दुर्गम आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाचा आनंद पोहोचविणे हा शासनाचा मुख्य उद्देश आहे. प्रत्येक विद्यार्थी सक्षम, सुसंस्कृत आणि राष्ट्रभक्त नागरिक घडावा यासाठी शिक्षणासोबतच व्यक्तिमत्त्व विकासावर भर दिला जात आहे.
तोरणमाळ येथील आवासीय विद्यालय हे 20 शाळांचे एकत्रीकरण करून उभारण्यात आले असून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी ते आशेचे केंद्र ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांसाठी नवीन सुविधा
विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधांसाठी येत्या सहा महिन्यांत बेड, शुद्ध पिण्याचे पाणी, सौरऊर्जा यंत्रणा आणि स्वच्छतागृहांच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, अशी घोषणा मंत्री भुसे यांनी केली. तसेच विद्यार्थ्यांची दरमहा आरोग्य तपासणी केली जाईल आणि शाळेसाठी रुग्णवाहिकेची सुविधाही उपलब्ध करून दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.
क्रीडा आणि स्वसंरक्षणावर भर
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘राणी लक्ष्मीबाई स्वसंरक्षण प्रशिक्षण’, सैनिक शिक्षण, योगासने आणि विविध व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रम राबविले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. प्रत्येक जिल्ह्यात क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्याचा शासनाचा मानस असून तोरणमाळ येथे क्रीडा अकादमी उभारण्याचाही विचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार आमश्या पाडवी यांची विकासाची भूमिका
आमदार आमश्या पाडवी यांनी धडगाव आणि अक्कलकुवा भागातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी क्रीडा संकुल उभारण्याची गरज व्यक्त केली. तसेच तोरणमाळ परिसरातील पर्यटन विकासामुळे स्थानिक आदिवासी बांधवांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले.
‘टॉप-नॉच’ शिक्षणावर भर : डॉ. मित्ताली सेठी
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान आणि आधुनिक कौशल्यांवर आधारित उच्च दर्जाचे शिक्षण देण्यावर प्रशासनाचा भर असल्याचे सांगितले. शाळेत विज्ञान प्रयोगशाळा, मेकर्स लॅब, स्पोर्ट्स ट्रॅक आणि क्रीडा अकादमीसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उत्साहात स्वागत
कार्यक्रमात नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, शैक्षणिक साहित्य आणि शुभेच्छांद्वारे स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह पाहायला मिळाला. दुर्गम तोरणमाळमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे परिसरात शैक्षणिक वातावरणाला नवी ऊर्जा मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.



