उज्जैन ते अमरावती १५ दिवसांची पायदळ कावड यात्रा पूर्ण; महाकाल भक्तांचे जल्लोषात स्वागत

भर पावसातही संकल्प पूर्ण; मसानगंज परिसर जय श्री महाकालच्या घोषणांनी दुमदुमला
अमरावती | प्रतिनिधी
श्रद्धा, भक्ती आणि अटळ संकल्पाचे प्रेरणादायी दर्शन घडवणारी कावड यात्रा यशस्वीरित्या पूर्ण करून अमरावतीतील महाकाल भक्तांचे शहरात उत्साहात स्वागत करण्यात आले. मध्यप्रदेशातील उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पायदळ अमरावतीत परतण्याचा संकल्प पूर्ण करत भक्तांनी तब्बल १५ दिवसांचा प्रवास पूर्ण केला.
अमरावतीच्या मसानगंज, मधुबन चौक परिसरातील महादेव भक्तांनी श्री महाकालेश्वराच्या दर्शनानंतर कावड खांद्यावर घेऊन उज्जैन ते अमरावती असा पायदळ प्रवास करण्याचा संकल्प केला होता. या संकल्पाची यशस्वी पूर्तता करत विनय साहू, नानू बरोरे आणि प्रज्वल अहरवार यांनी अखंड भक्तिभावाने १५ दिवसांची यात्रा पूर्ण केली.
भर पावसातही कोणत्याही अडचणींची पर्वा न करता भक्तांनी “जय श्री महाकाल” आणि “हर हर महादेव”च्या अखंड जयघोषात हा प्रवास पूर्ण केला. त्यांच्या श्रद्धा आणि चिकाटीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
महाकाल भक्त अमरावतीत दाखल होताच मसानगंज परिसरात त्यांचे ढोल-ताशांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात आणि जय श्री महाकालच्या घोषणांनी भव्य स्वागत करण्यात आले. या स्वागत सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.
यानंतर सर्व महाकाल भक्तांनी शहरातील शिवमंदिरात जाऊन भगवान शंकराचे दर्शन घेतले. मंदिर परिसरातही भाविकांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून अनेक भाविकांनी त्याचा लाभ घेतला.
या यात्रेमुळे श्रद्धा, संयम, शिस्त आणि समर्पणाचा प्रेरणादायी संदेश समाजापर्यंत पोहोचल्याची भावना उपस्थित भाविकांनी व्यक्त केली. युवकांनी अध्यात्म आणि संस्कृतीशी नाते जोडत अशा धार्मिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे मतही अनेकांनी यावेळी व्यक्त केले.
उज्जैन ते अमरावती असा १५ दिवसांचा पायदळ प्रवास पूर्ण करून महाकाल भक्तांनी श्रद्धा आणि समर्पणाचे प्रेरणादायी उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. त्यांच्या या भक्तिमय यात्रेचे शहरभर कौतुक होत असून, “जय श्री महाकाल” आणि “हर हर महादेव”च्या जयघोषाने अमरावतीचे वातावरण भक्तिरसाने भारावून गेले आहे.



