‘100 टक्के’ दाव्यांवर FSSAI ची कारवाई; डाबरच्या अनेक खाद्यपदार्थांच्या विक्रीवर बंदी

‘100% Natural’, ‘100% Pure’, ‘100% Organic’ यांसारखे दावे दिशाभूल करणारे; FSSAI चा डाबर इंडिया लिमिटेडला आदेश
नवी दिल्ली : अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) डाबर इंडिया लिमिटेडच्या अनेक खाद्यपदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. या उत्पादनांवर “100 टक्के नैसर्गिक”, “100 टक्के शुद्ध”, “100 टक्के शुद्धतेची हमी”, “100 टक्के ऑर्गेनिक” आणि “100 टक्के टेंडर नारळ पाणी” असे दावे करण्यात आले होते. हे दावे अस्पष्ट, पडताळणी न करता येणारे आणि ग्राहकांची दिशाभूल करणारे असल्याचे FSSAI ने स्पष्ट केले आहे.
FSSAI ने सोमवारी सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, डाबर इंडिया लिमिटेडला या दाव्यांसह विक्री होणाऱ्या उत्पादनांवर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे.
या कारवाईत मध, गायीचे तूप, खाद्यतेले, ॲपल सायडर व्हिनेगर, व्हर्जिन नारळ तेल, तीळ तेल, नारळ पाणी, नारळाचे दूध तसेच इतर काही खाद्यपदार्थांचा समावेश आहे.
FSSAI च्या म्हणण्यानुसार, Food Safety and Standards (Advertising & Claims) Regulations, 2018 अंतर्गत अशा प्रकारचे “100 टक्के” दावे नियमांचे उल्लंघन ठरतात. कारण अशा दाव्यांची शास्त्रीय पडताळणी करणे शक्य नसते आणि त्यामुळे ग्राहकांमध्ये चुकीचा समज निर्माण होण्याची शक्यता असते.
तपासादरम्यान डाबरच्या अधिकृत संकेतस्थळावरही अनेक उत्पादनांवर “100 टक्के” अशा प्रकारचे दावे आढळून आले. यानंतर FSSAI ने संबंधित उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घालत कंपनीला आवश्यक निर्देश दिले आहेत.



