गुजरातमध्ये भीषण बस अपघात; दोन एसटी बसांची समोरासमोर धडक, ७ ठार तर ४० जखमी

सुरत, प्रतिनिधी : गुजरातमधील सुरत जिल्ह्यात मंगळवारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) दोन बसांची भीषण धडक होऊन एक बस पेटल्याने सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर सुमारे ४० प्रवासी जखमी झाले. ही दुर्घटना बारडोलीजवळील उवा गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक बस सुरतहून धुळ्याकडे जात होती, तर दुसरी बस महाराष्ट्रातील चाळीसगावहून सुरतकडे येत होती. चाळीसगावहून येणाऱ्या बसने महामार्गावर एका ट्रॅक्टरला धडक दिली. त्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या बसवर आदळली.
धडकेची तीव्रता इतकी होती की, सुरतकडे जाणारी बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात उलटली आणि त्यानंतर तिला आग लागली. आगीत बसमधील अनेक प्रवासी अडकले. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि प्रशासनाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
या अपघातात मृत्यूमुखी पडलेले सर्व सात जण आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या बसमधील प्रवासी असल्याचे पोलिस अधीक्षक राजेश घडिया यांनी सांगितले. जखमींना तातडीने बारडोली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मृतांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली असून जखमी प्रवाशांना मोफत आणि सर्वोत्तम वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
या भीषण अपघातामुळे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



