Amaravti GraminAmravaticitynewsLatest NewsMaharashtra

परतवाड्यात सरगम बिअर शॉपीला भीषण आग; शॉर्टसर्किटमुळे लाखोंचे नुकसान

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरातील आठवडी बाजार परिसरात आज सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. सरगम बिअर शॉपी या दुकानाला अचानक आग लागून संपूर्ण दुकान जळून खाक झाले. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आग लागल्यानंतर काही क्षणांतच ज्वाळांनी रौद्ररूप धारण केले. दुकानातील बिअरच्या बाटल्या, फर्निचर, इलेक्ट्रिक साहित्य आणि इतर वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. आगीची तीव्रता इतकी होती की परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच अचलपूर नगरपालिकेचा अग्निशमन विभाग तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन दलाने आणि स्थानिक व्यापाऱ्यांनी संयुक्तपणे शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. त्यांच्या तत्परतेमुळे आग शेजारील दुकानांपर्यंत पसरण्यापासून रोखण्यात यश आले.

या आगीत दुकानाचे संचालक जयस्वाल आणि सुरेश वाधवानी यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. नुकसानाची नेमकी रक्कम अद्याप स्पष्ट झाली नसली तरी लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, संपूर्ण दुकान जळून खाक झाल्याने व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

दरम्यान, घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमन विभागाने पंचनामा सुरू केला असून आगीचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button