विदर्भात उष्णतेचा इशारा कायम! १६ जूनपर्यंत हीट अलर्ट; मॉन्सूनच्या आगमनाचीही चाहूल

विदर्भात वाढत्या तापमानामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आले असून नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. विशेषतः विद्यार्थी, शेतमजूर आणि उन्हात काम करणाऱ्या कामगारांच्या आरोग्याची काळजी घेण्यावर भर देण्यात आला आहे.
उन्हाच्या तीव्रतेमुळे उष्माघाताचा धोका वाढत असल्याने स्थानिक प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुपारच्या वेळेत नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मे आणि जून या दोन महिन्यांसाठी विदर्भात हीट अलर्ट लागू करण्यात आला असून नागपूर आणि चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात विशेष उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. नागपूर जिल्ह्यातही उष्णतेच्या लाटेसंदर्भात आपत्कालीन तयारी ठेवण्यात आली आहे. या उपाययोजना १६ जूनपर्यंत लागू राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आढावा बैठकीत दिली.
दरम्यान, उष्णतेच्या पार्श्वभूमीवर दिलासादायक बातमी म्हणजे नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या आगमनासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. दक्षिण बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्र परिसरात ढगांची सक्रियता वाढली असून शनिवारपर्यंत अंदमान-निकोबार बेटांवर मॉन्सून दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
विदर्भात सध्या उष्णतेची तीव्रता कायम असली तरी मॉन्सूनच्या हालचालींमुळे लवकरच वातावरणात बदल होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.



