Education NewsIndia NewsLatest News

NEET 2026 पुन्हा होणार! पेपरफुटीनंतर मोठा निर्णय; २१ जूनला देशभरात री-एक्झाम

देशभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नीट परीक्षा २०२६ (NEET 2026) संदर्भातील सर्वात मोठा निर्णय अखेर जाहीर करण्यात आला असून रद्द करण्यात आलेली परीक्षा आता २१ जून २०२६ रोजी पुन्हा घेतली जाणार आहे. पेपरफुटीच्या गंभीर आरोपांनंतर केंद्र सरकार आणि परीक्षा आयोगाने हा मोठा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी ३ मे २०२६ रोजी देशभरात नीट परीक्षा पार पडली होती. मात्र परीक्षा संपल्यानंतर काही तासांतच प्रश्नपत्रिका फुटल्याचे आरोप समोर आले आणि देशभरात खळबळ उडाली. सुरुवातीला काही राज्यांपुरता संशय मर्यादित होता, पण तपास वाढताच राजस्थान, हरियाणा, महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर आणि लातूरपर्यंत या रॅकेटचे धागेदोरे पोहोचल्याची माहिती समोर आली. काही आरोपींना अटक करण्यात आली असून अनेक संशयितांची चौकशी सुरू आहे.

तपासादरम्यान काही विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका पोहोचल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने तपास थेट सीबीआयकडे सोपवला. सीबीआयच्या प्राथमिक चौकशीत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचे संकेत मिळाल्यानंतर परीक्षा प्रक्रिया थांबवण्यात आली आणि अखेर नीट परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, केंद्रीय शिक्षण मंत्री Dharmendra Pradhan यांच्या दिल्लीतील निवासस्थानी काल उशिरापर्यंत उच्चस्तरीय बैठक पार पडली. जवळपास दोन तास चाललेल्या या बैठकीत नीट आणि नेट परीक्षेतील पेपरफुटी, परीक्षा सुरक्षाव्यवस्था, प्रक्रियेतील त्रुटी आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीला उच्च शिक्षण सचिव सचिन विनीत जोशी, शालेय शिक्षण सचिव संजय कुमार, एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आयोगाने सीबीआयला पूर्ण सहकार्य करण्याचे स्पष्ट केले असून तपास यंत्रणा आता या रॅकेटमागील मोठ्या मास्टरमाइंडपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. काही मोठी नावेही तपासात समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आता २१ जून रोजी होणारी नीट परीक्षा पूर्णपणे पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात पार पडावी यासाठी केंद्र सरकार आणि संबंधित यंत्रणा विशेष खबरदारी घेत आहेत. लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य या परीक्षेशी जोडलेले असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button