मानसोपचार क्षेत्रातील दीपस्तंभ हरपला; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डॉ. आनंद नाडकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई, दि. १५ : ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि ख्यातनाम लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या निधनाने वैद्यकीय, सामाजिक आणि साहित्य क्षेत्राला मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत, “मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून दीपस्तंभासारखे कार्य करणारे संवेदनशील व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे,” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, डॉ. आनंद नाडकर्णी यांनी मानसोपचाराकडे केवळ वैद्यकीय उपचार म्हणून पाहिले नाही, तर त्याला सामाजिक वास्तवाची जोड देत मानसिक आरोग्याबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले.
मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांनी व्याख्याने, संशोधन, समुपदेशन आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजाशी सतत संवाद साधला. आयपीएच (Institute for Psychological Health), मुक्तांगण आणि इतर सामाजिक संस्थांद्वारे त्यांनी हजारो कुटुंबांना आधार दिला.
डॉ. नाडकर्णी हे एक उत्कृष्ट लेखकही होते. त्यांच्या लालित्यपूर्ण लेखनशैलीमुळे मराठी साहित्यात अनेक दर्जेदार पुस्तके, लेख आणि कवितासंग्रहांची भर पडली. मानसिक आरोग्य, नातेसंबंध, व्यसनमुक्ती आणि सामाजिक विषयांवर त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.
मुख्यमंत्री म्हणाले, “त्यांच्या निधनामुळे वैद्यकीय, सामाजिक आणि साहित्य क्षेत्रांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा तुटला आहे. त्यांच्या जाण्याने सर्वच क्षेत्रांचे मोठे नुकसान झाले आहे.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत, ईश्वराने त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती द्यावी, अशी प्रार्थना केली आहे.



